गरजेपोटीच्या बांधकामांसंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय
By Admin | Updated: October 6, 2016 03:52 IST2016-10-06T03:52:42+5:302016-10-06T03:52:42+5:30
प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावठाणात उभारलेल्या गरजेपोटीच्या बांधकामांसंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिले आहे.

गरजेपोटीच्या बांधकामांसंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावठाणात उभारलेल्या गरजेपोटीच्या बांधकामांसंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिले आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नही जलदगतीने सोडविले जातील, असेही गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.
बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने बुधवारी गगराणी यांची भेट घेवून विविध प्रश्नांवर चर्चा केली. विशेषत: सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर केली जाणारी कारवाई अन्यायकारक असल्याने ती त्वरित थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहराच्या निर्मितीसाठी सिडकोने येथील शेतजमिनी संपादित केल्या आहेत. गावठाणांचे संपादन झालेले नाही. नियमाप्रमाणे संपादित न झालेल्या जमिनीवरील घरांच्या वाढीव बांधकामांसाठी कायदेशीर नकाशा मंजूर करून घेण्याची तरतूद कोणत्याही कायद्यात नाही. असे असतानाही सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर सर्रास कारवाई केली जात आहे. त्यामुळे सर्वप्रथम कोणती बांधकामे अधिकृत व कोणती अनधिकृत याची वर्गवारी करा. तोपर्यंत कोणत्याही बांधकामांवर कारवाई करू नये, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी केली. याप्रकरणी लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिले. या बैठकीत विविध चार विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे विद्यावेतन बंद करू नये, बेलापूर येथील मरीना प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करावे, बेलापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस कार्यवाही करावी, प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेल्या भूखंडांची मालकी संबंधित संस्थेकडे हस्तांतरित करावी आणि संबंधित संस्थेच्या शाळेसाठी क्रीडांगण म्हणून जवळचा मोकळा भूखंड द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन गगराणी यांनी यावेळी दिले.
या शिष्टमंडळात प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, उपाध्यक्ष मनोहर पाटील, विजय घाटे, माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील व माजी नगरसेवक नीलेश म्हात्रे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)