पक्षांतराच्या राजकारणाचा नवी मुंबईच्या विकासावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:56 AM2019-08-15T03:56:31+5:302019-08-15T03:57:16+5:30

माजी मंत्री गणेश नाईक समर्थकांच्या पक्षांतराचा परिणाम शहराच्या विकासावर होऊ लागला आहे.

politics influence on the development of Navi Mumbai | पक्षांतराच्या राजकारणाचा नवी मुंबईच्या विकासावर परिणाम

पक्षांतराच्या राजकारणाचा नवी मुंबईच्या विकासावर परिणाम

Next

नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक समर्थकांच्या पक्षांतराचा परिणाम शहराच्या विकासावर होऊ लागला आहे. सलग तीन आठवडे स्थायी समितीची सभा झालेली नाही. मे नंतर परिवहन समितीची बैठकही होऊ शकली नसून, नोव्हेंबरपर्यंत परिवहनचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणुका जवळ आल्या की, महानगरपालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी देण्याची स्पर्धा सुरू होते. नवी मुंबईमध्येही यापूर्वी सर्वच निवडणुकांच्या वेळी हे चित्र पाहावयास मिळत होते; परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक माजी महापौरांसह माजी नगरसेवकांची फौज घेऊन प्रत्यक्ष भाजपात गेले आहेत. गणेश नाईक व महापालिकेमधील नगरसेवकही लवकरच पक्षांतर करण्याची चर्चा सुरू आहे.

या सर्व प्रक्रियेचा परिणाम विकासकामांवर होऊ लागला आहे. नाईक समर्थकांची २९ जुलैला महापौर बंगल्यावर मिटिंग झाल्यानंतर पक्षांतराच्या हालचालींना वेग आला, तेव्हापासून स्थायी समितीची एकही सभा झालेली नाही. या कालावधीमध्ये तीन सभा होणे अपेक्षित होते. गणेशोत्सवानंतर विधानसभेसाठीची आचारसंहिता लागणार असून, स्थायी समितीच्या सभा न झाल्यास अनेक प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे. किंवा शेवटच्या काही आठवड्यांमध्ये चर्चा न होताच कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावांवर पुरेशी चर्चा न होताच त्यांना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समितीच्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. मे महिन्यामध्ये सभा झाली होती. या नंतर परिवहनमधील सहा जण निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्य निवडताना विरोधी पक्षांना डावलण्यात आले. फक्त राष्ट्रवादी काँगे्रसच्याच सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडीला शिवसेनेने शासनाकडे आव्हान दिले. शासनाने नियमबाह्य निवडीला स्थगिती दिली आहे. यामुळे परिवहन समितीची सभा झालेली नाही. आॅगस्टमध्ये सभा झाली नाही तर विधानसभेची निवडणूक होईपर्यंत कामकाज ठप्प राहणार आहे. नोव्हेंबरनंतरच कामकाज होऊ शकणार आहे, यामुळे परिवहनशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत.

केंद्र शासनाने नवी मुंबईसाठी १०० इलेक्ट्रिकल बसेस मंजूर केल्या आहेत. या बसेस महापालिकेच्या ताफ्यात आल्यानंतर त्याचा वापर करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी या विषयी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता स्थायी समितीसाठी विषय नसल्यामुळे मिटिंग झाली नसल्याचे सांगण्यात आले. सर्वसाधारण सभा २० आॅगस्टला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले; पण स्थायी समितीची सभा नक्की कधी होणार या विषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही. स्थायी समिती सभापती नवीन गवते यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

परिवहन समितीची शेवटची सभा मे महिन्यामध्ये झाली आहे. त्यानंतर एकही सभा होऊ शकली नाही. आॅगस्टमध्ये बैठक झाली नाही तर नोव्हेंबरपर्यंत सभा घेता येणार नाही. सभा आयोजित करण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे; परंतु प्रशासनाने अद्याप काहीही कार्यवाही केलेली नाही.
- सुधीर पवार, परिवहन समिती सदस्य, काँगे्रस

विकासकामे पूर्ण करण्याचे आव्हान
नवी मुंबई महानगरपालिकेने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ४०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आर्थिक वर्षातील दोन महिने कामकाज होऊ शकले नाही. पक्षांतराच्या गोंधळामुळे एक महिना फुकट गेला असून, पुढील दोन महिने विधानसभा निवडणुकीमुळे कामकाज होऊ शकणार नाही. मार्चमध्ये पुन्हा महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्यामुळे अर्थसंकल्पातील नियोजित कामे करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Web Title: politics influence on the development of Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.