पोलीस भरतीच्या आमिषाने गंडा
By Admin | Updated: September 2, 2015 03:52 IST2015-09-02T03:52:55+5:302015-09-02T03:52:55+5:30
पोलीस खात्यात भरती करून देतो सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी चौदा जणांची फसवणूक केल्याचे समोर आले

पोलीस भरतीच्या आमिषाने गंडा
नवी मुंबई : पोलीस खात्यात भरती करून देतो सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या चौघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी चौदा जणांची फसवणूक केल्याचे समोर आले असून राज्यभरातील अनेकांना त्यांनी फसवल्याची शक्यता आहे. त्यापैकी एकाला मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या प्रशस्तिपत्राचाच वापर तो स्वत:ला पोलीस असल्याचे सांगण्यासाठी करायचा.
नवी मुंबई पोलीस दलात शिपाई पदावर भरती करून देतो सांगून फसवणूक झाल्याची तक्रार नेरूळ पोलिसांकडे आली होती. स्वत:ला पोलीस सांगणाऱ्या एका अधिकारी व त्याच्या सहकाऱ्यांनी या उमेदवाराकडून भरतीसाठी ४ लाख रुपये घेतले होते. मात्र पैसे घेतल्यानंतर तो गायब व्हायचा. यासंबंधीचा गुन्हा दाखल होताच नेरूळ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. राजेंद्र सपकाळ, संदीप चव्हाण, नारायण राव व रवींद्र सागवेकर अशी त्यांची नावे आहेत. सपकाळला न्यायालयीन कोठडी मिळाली असून इतर तिघे अद्याप कोठडीत आहेत. या टोळीने सातारा, सांगली परिसरातील अनेक तरुणांना पोलीसमध्ये भरती करून देतो, असे सांगून लाखोंची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यापैकी १४ गुन्ह्यांची कबुलीही त्यांनी दिल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.
फसवणुकीची तक्रार दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फांसो, निरीक्षक नागराज मजगे, जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला. गतवर्षीच्या नवी मुंबई पोलीस भरतीदरम्यान नेरूळ रेल्वे स्थानकालगत चव्हाणच्या कार्यालयात उमेदवारांच्या मुलाखती व्हायच्या. सपकाळच्या माध्यमातून या सर्वांची एकमेकांशी ओळख झाली होती. यामध्ये पोलीस मुख्यालयात कामाला असल्याचे सांगणाऱ्या एका शिंदे नावाच्या पोलिसाचाही समावेश आहे. परंतु तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस मुख्यालयातल्या शिंदेशी आपली ओळख असल्याचे सांगून सागवेकर व सपकाळ हे दोघे भरतीसाठी इच्छुकांचा शोध घ्यायचे. त्यापैकी ३ ते ४ लाख रुपये देण्याची तयारी असलेल्यांना नेरुळ येथे चव्हाणच्या जॉब प्लेसमेंट कार्यालयात बैठका व्हायच्या. त्याठिकाणी बनावट स्टँप वापरून पोलीस भरतीमध्ये निवड झाल्याची बनावट पत्रेही त्यांनी अनेकांना दिलेली आहेत. तक्रारदार तरुणाने नेरुळच्या याच जागेची माहिती पोलिसांना दिली होती. परंतु कार्यालय व मोबाइलचे नंबर बदलल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. अखेर तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून शिताफीने अटक केल्याचे उपआयुक्त उमाप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)