ईव्हीएम पोचल्या मतदान केंद्रांवर, पोलिस बंदोबस्तात निवडणूक साहित्यांचे नियोजनबद्ध वाटप
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 19, 2024 19:29 IST2024-05-19T19:29:34+5:302024-05-19T19:29:41+5:30
नवी मुंबई : सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर ईव्हीएम पोचवण्याचे काम रविवारी उरकण्यात आले. त्यामध्ये ऐरोली विधानसभेच्या निवडणूक ...

ईव्हीएम पोचल्या मतदान केंद्रांवर, पोलिस बंदोबस्तात निवडणूक साहित्यांचे नियोजनबद्ध वाटप
नवी मुंबई : सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर ईव्हीएम पोचवण्याचे काम रविवारी उरकण्यात आले. त्यामध्ये ऐरोली विधानसभेच्या निवडणूक केंद्रातून ४२९ इलेकट्रीक वोटिंग मशीनसह इतर साहित्य पाठवण्यात आले. चोख पोलिस बंदोबस्तात कोणत्याही गोंधळाविना हि प्रक्रिया पार पडली.
मागील दीड महिन्यांपासून उमेदवारांसह मतदारांना प्रतीक्षा असलेला मतदानाचा दिवस अखेर उगवला आहे. ठाणे लोकसभेसाठी ऐरोली विधानसभा क्षेत्रात ७७ केंद्रांमध्ये ४२९ बुथवर सोमवारी मतदान होणार आहे. त्यासाठी रविवारी ऐरोली येथील निवडणूक केंद्रातून पोलिस सुरक्षेत ईव्हीएम पाठवण्यात आल्या. त्यासाठी सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात प्रशस्त मंडप उभारण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाने यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण प्रक्रिया झाली. यावेळी नायब तहसीलदार दत्तात्रेय बेर्डे, प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश बदले, तहसीलदार राहुल सारंग, सहायक पोलिस आयुक्त योगेश गावडे यांच्यासह इतर निवडणूक अधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
मागील वेळेस मशीन वाटपदरम्यान गोंधळामुळे प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे यंदा प्रक्रियेत शिस्तबद्धता आणून नियोजनबद्धरीत्या मशीनचे वाटप करण्यात आले. त्यामुळे सकाळी ९ वाजता सुरु झालेली प्रक्रिया दुपारी १२.३० पर्यंत पूर्ण होऊन सर्व मशीन मतदान केंद्राकडे रवाना झाल्या. त्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तयारीला लागले होते. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याठिकाणी सहायक पोलिस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाय संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण देखील केले जात होते. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया वेळेत व निर्विघ्न पार पडल्याने दुपार पर्यंत सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम पोहचवण्यात यंत्रणेला यश आले.