प्लेसमेंट नोकरी देणारे की फसवणूक करणारे; नोकरी शोधताना अडकाल गुन्हेगारांच्या जाळ्यात
By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 16, 2025 12:36 IST2025-10-16T12:36:36+5:302025-10-16T12:36:44+5:30
घणसाेलीतील प्रकरणामुळे नवी मुंबईतील सर्वच प्लेसमेंट कार्यालये पोलिसांच्या रडारवर

प्लेसमेंट नोकरी देणारे की फसवणूक करणारे; नोकरी शोधताना अडकाल गुन्हेगारांच्या जाळ्यात
-सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर चांगली नोकरी मिळवून अनेक जण आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट धरू पाहतात; मात्र अनेकदा नोकरीच्या शोधात असताना चुकीच्या प्लेसमेंटमध्ये पडलेले पाऊल त्यांचे भविष्य व आयुष्यभर जमा केलेला निधी हिरावून घेणारे ठरू शकते. तरुण, तरुणींना देश-विदेशात नोकरीची हमी देऊन फसवणुकीच्या घटना सातत्याने घडत आहेत.
देशभरातील तरुणांना गळाला लावणाऱ्या फसव्या प्लेसमेंट नवी मुंबईतून चालवल्या जात आहेत. वेळोवेळी असे अनेक गंभीर प्रकार समोर आल्यानंतर गुन्हे दाखल झाले आहेत; मात्र काही महिने चालणाऱ्या प्लेसमेंटमधून कोट्यवधींची माया गोळा करून संबंधितांनी धूम ठोकल्यावर असे प्रकार समोर येतात. त्यापैकी काही प्रकरणात ठराविक टोळ्यांचा सहभाग दिसून आलेला आहे. नुकतेच नवी मुंबई मनसेने घणसोली येथील एका प्लेसमेंटच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नवी मुंबईतल्या सर्वच प्लेसमेंट कार्यालये पोलिसांच्या रडारवर आणली आहेत.
नोकरी लावण्यासाठी मुलाखती घेण्याचे कायद्याने अधिकार नसतानाही अनेक प्लेसमेंट चालतात कशा? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. नवी मुंबईत नेरुळमधील हावरे सेंच्युरियन, वाशीमधील हावरे फंटासिया व सीबीडी परिसरात बहुतांश फसवी प्लेसमेंट कार्यालये सुरू करून रातोरात गुंडाळलीदेखील जात आहेत. त्यामुळे अशा प्लेसमेंट कार्यालयांना कायद्याच्या चौकटीत घेण्याची गरज निर्माण
झाली आहे.
मोक्कांतर्गत कारवाईची गरज
नवी मुंबईतून अनेकांना दुबई किंवा इतर देशात नोकरी लागल्याचे सांगून प्रत्यक्ष त्यांना देशाबाहेर पाठवून अडचणीत टाकण्याचेही प्रकार घडले आहेत.
या गुन्ह्यांमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती सहभागी आल्याने त्यांच्याकडून नियोजनबद्ध कट रचून तरुणांची फसवणूक केली जाते. यात जागामालक, परवाना देणारे गुमास्ता कार्यालयातील अधिकारी, संबंधित पोलिस ठाणे यांनी आपसांत समन्वय ठेवला तर असे प्रकार रोखता येऊ शकतात; परंतु यांच्यातच समन्वय नसल्याने ही संघटित गुन्हेगारी फोफावत आहे.
व्यवसायाच्या परवान्यावर गंडवायचा उद्योग
प्लेसमेंट कार्यालयात थाटताना महापालिकेचा किरकोळ व्यवसाय परवाना घेतला जातो. त्यासाठी कागदोपत्री व प्रत्यक्षात प्रक्रिया हाताळणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या असतात. त्यांच्याकडून प्लेसमेंटच्या नावाखाली नोकरीच्या शोधात असलेल्यांना गळाला लावले जाते.