मुलांना शाळेत पाठविण्यास तालुक्यातील पालकांचा नकार, ऑनलाइन शिक्षणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 01:57 AM2021-01-31T01:57:59+5:302021-01-31T01:58:32+5:30

Crime News : पनवेल तालुक्यातील ५वी ते ८वी पर्यंच्या शाळा शिक्षण विभागाकडून २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश असले, तरी बहुतांश शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

Parents in the taluka refuse to send their children to school | मुलांना शाळेत पाठविण्यास तालुक्यातील पालकांचा नकार, ऑनलाइन शिक्षणाची मागणी

मुलांना शाळेत पाठविण्यास तालुक्यातील पालकांचा नकार, ऑनलाइन शिक्षणाची मागणी

Next

कळंबाेली - पनवेल तालुक्यातील ५वी ते ८वी पर्यंच्या शाळा शिक्षण विभागाकडून २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश असले, तरी बहुतांश शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. काही शाळेतील शिक्षकांच्या कोरोना चाचणी झालेल्या नाहीत, तर काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. 

१० महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पनवेल तालुक्यात ५वी ते ८वी पर्यंतच्या एकूण ४१७ शाळा आहेत, तर विद्यार्थी संख्या ७२,४५३ इतकी आहे. त्यानुसार बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत, तर महापालिका परिसरातील काही शाळा बंद आहेत. जि. प. शाळेसह खासगी शाळा सुरू करण्यासाठी पालकांकडून संमतीपत्र घेण्यात येत आहे. यास पालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण देण्याची मागणी काही पालकांकडून करण्यात येत आहे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाने संमतीपत्र देणे आवश्यक आहे. संमतीपत्र असल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार नाही .त्यामुळे पालकांनी संमतीपत्र दिले तरच शाळा सुरू होतील, अशी स्थिती आहे.

काटेकोर नियम पाळण्याची गरज 
कोरोना काळात बंद असलेल्या शाळा सुरू होत आहेत. शाळांना कोरोना संरक्षणाबाबतचे नियम घालून दिले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. शाळा दररोज निर्जंतुकीकरण करणे, विद्यार्थी एका बाकावर एकच बसण्याची व्यवस्था करणे, सॅनिटायझर, मास्क, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर, साबण, पाणी या आवश्यक गोष्टींची उपलब्धता शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार आहे. 

कोरोनाचा काळ पूर्णपणे संपलेला नाही. पनवेल परिसरात रुग्ण आढळत आहेत. लहान मुलांची जबाबदारी कोण घेणार?, शाळा सुरू करण्यासाठी आमच्याकडून संमतीपत्र घेत आहेत; पण मुलांच्या आरोग्याबाबत हमी घेत नसल्याने आम्ही पाल्यांना शाळेत पाठविणार नाही.
- नरेश म्हात्रे, पालक

शाळा सुरू झाल्या आहेत. संमतीपत्र देण्यास शाळेकडून सांगितले आहे. शैक्षणिक वर्षातले तीन महिने राहिले आहेत. पनवेल परिसरात कोरोनाचे संसर्ग रुग्ण सापडत आहेत. ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण सुरू ठेवावे. आम्ही तरी मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे.
- संजय पवार, पालक

Web Title: Parents in the taluka refuse to send their children to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.