वैभव गायकर प्रतिनिधी
पनवेल महापालिकेत कार्यरत असलेल्या शुभांगी घुले हिने थेट अमेरिकेत आपल्यासह पनवेल महापालिकेचा नावलौकिक केला आहे. जगभरातील ७१ देशातील पोलिस कर्मचारी आणि अग्निशमनचे कर्मचारी अलाबामा येथील अल्टिमेट फायर फायटिंग चॅलेंज या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा आगीच्या आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात वास्तवात येणाऱ्या आव्हानांसारखी असते आणि जगभरातील अग्निशमन दलाच्या व्यावसायिक क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवते. या स्पर्धेत शुभांगीला कांस्य पदक मिळाले. याबाबत शुभांगीशी साधलेला संवाद.
ही स्पर्धा नेमकी काय आहे ?
शुभांगी घुले : ७१ देशांमधील महिला पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलातील महिला प्रतिनिधींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता, संकटप्रसंगी घेतले जाणारे जलद निर्णय, टीमवर्क आणि मानसिक ताकद यांची कसून परीक्षा घेतली जाते. ही स्पर्धा जागतिक पातळीवर महिलांच्या प्रतिनिधीत्वाचा आणि क्षमतेचा भव्य सन्मान करणारी आहे.
स्पर्धेत निवड कशी झाली ?
शुभांगी घुले : अल्टिमेट फायर फायटिंग चॅलेंज या खेळामध्ये मी खेळायचे ठरवले. फेब्रुवारी २०२५ ला दिल्ली येथे ऑल इंडिया नॅशनल फायर सर्व्हिस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड यांनी घेतलेल्या स्पर्धेमध्ये मी पहिली आले. त्यानंतर अमेरिकेतील अलाबामा येथील जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली.
शिक्षण आणि लहानपण कसे गेले ?
शुभांगी घुले : वडिलांच्या मेंढपाळ व्यवसायामुळे वयाच्या सहाव्या महिन्यापासून बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथे मामाच्या गावी आजी-आजोबांकडे राहावे लागले. दहावीपर्यंतचे शिक्षण सोमेश्वर विद्यालय, करंजे येथे झाले. तर पुढील शिक्षण बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळेत झाले. पदवीचे शिक्षण मुंबई येथे चालू असतानाच महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकादमीचा फायरमन हा कोर्स पूर्ण केला. २०२३-२४ मध्ये पनवेल महापालिकेमध्ये महिला अग्निशामक म्हणून प्रथमच भरती निघाली. त्यामध्ये पहिल्या तिघांमध्ये माझी निवड झाली.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता का ?
शुभांगी घुले : ही माझी पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि पहिल्याच प्रयत्नात कांस्य पदक मिळवणे, हा माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. या यशाचे सर्व श्रेय पनवेल महापालिकेला आणि माझ्या कुटुंबाला जाते. विशेषतः आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गवाडे, अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके, सूर्यवंशी आणि राठोड सर यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे आणि विश्वासामुळेच हे यश मिळवता आले. माझ्या कुटुंबीयांनीही प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला. हे पदक केवळ माझं वैयक्तिक यश नसून, माझ्या टीमचा, संस्थेचा आणि कुटुंबाचा सामूहिक विजय आहे.
प्रेरणा कुठून मिळाली ?
शुभांगी घुले : मेंढपाळ असणारे माझे आई-वडील मला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यांच्याकडून मला खूप मेहनत करण्याची प्रेरणा मिळते. माझ्या आजी-आजोबांच्या कष्टाचे चीज झाले. ही स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वाचा अनुभव होता. देशासाठी पदक जिंकले, याचा मला अभिमान वाटत आहे. यापेक्षा उत्कृष्ट कामगिरी करण्याचे माझे पुढील ध्येय राहील.