पनवेलकरांना आवडतो एक, फॅन्सी नंबरसाठी मोजतात चार लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:02 AM2020-12-16T01:02:35+5:302020-12-16T01:02:43+5:30

पनवेल आरटीओच्या तिजोरीत कोटींचे उत्पन्न, मागणीत वाढ

Panvelkar's favorite one, fancy numbers cost four lakh rupees | पनवेलकरांना आवडतो एक, फॅन्सी नंबरसाठी मोजतात चार लाख रुपये

पनवेलकरांना आवडतो एक, फॅन्सी नंबरसाठी मोजतात चार लाख रुपये

Next

- वैभव गायकर

पनवेल: वाहनांसाठी आवडीची नंबरप्लेट्स ही सध्या एक नवीन फॅशन झाली आहे. फॅन्सी नंबरच्या शुल्कात सात वर्षांपूर्वी परिवहन विभागातर्फे तिप्पट वाढ करण्यात आली. आता पुन्हा हे शुल्क वाढविले जाणार आहे. तरीही आवडीच्या नंबरसाठी वाहनचालक आग्रही आहेत.. 
पनवेल आरटीओला व्हीआयपी नंबरमुळे कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाल्याचे दिसून येत आहे. २०१९-२० वर्षात पनवेल आरटीओला आवडीच्या क्रमांकासाठी सुमारे ३ कोटी २१ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. या वर्षी कोरोनामुळे निम्मे वर्ष लॉकडाऊनमध्येच गेले असले, तरी २०२०-२१ मध्ये पनवेल आरटीओला नोव्हेंबर महिन्यापर्यंत १ कोटी ९१ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. पनवेल आरटीओ कार्यालयांतर्गत पनवेल, उरण, खालापूर आदी तालुक्यांचा समावेश आहे. सन २०१९-२० मध्ये ३७१९ जणांनी आवडते क्रमांक घेण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे अर्ज केल्याचे पाहावयास मिळाले आहे, तर सन २०२०-२१ मध्ये २,०८९ जणांनी आवडते क्रमांक घेतले आहेत. याकरिता आरटीओमार्फत आकारली जाणारी अतिरिक्त फी भरली आहे. 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमी प्रमाणात गाड्यांची विक्री झाली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात गाड्यांची विक्री झाली असून, व्हीआयपी नंबरची मागणी वाढल्याचे पनवेल आरटीओचे उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले. 

व्हीआयपी नंबरच्या माध्यमातून आरटीओच्या उत्पन्नात चांगली भर पडत आहे. या वर्षी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मागील वर्षीच्या तुलनेत कमी उत्पन्न व्हीआयपी नंबरमधून मिळाले आहेत. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यावर वाहन घेण्याचा काळ वाढल्याचे दिसून आले.  
-अनिल पाटील , (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल)

प्रतिष्ठा जपण्यासाठी लाखो रुपये मोजायची तयारी
व्हीआयपी नंबरसाठी लाखो रुपये मोजायची तयारी असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये १, १०, १०० क्रमांकासह अनेक व्हीआयपी क्रमांकांचा समावेश आहे. कुटुंबातील सर्व गाड्यांना एकच क्रमांक घेण्याचा नवीन ट्रेंडही पनवेलमध्ये पाहावयास मिळत आहे. व्हीआयपी क्रमांकाच्या या ट्रेंडमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

या तीन नंबर्सना सर्वाधिक दर
०१- ४,००,००० (रुपये)
०९- १,५०,००० (रुपये)
१११- ७०,००० (रुपये)

Web Title: Panvelkar's favorite one, fancy numbers cost four lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.