पनवेलमध्ये स्त्री जन्मदर कमीच

By Admin | Updated: March 7, 2015 22:29 IST2015-03-07T22:29:48+5:302015-03-07T22:29:48+5:30

शहरीबहुल समजल्या जाणाऱ्या पनवेल परिसरात स्त्री जन्मदर कमी असल्याचे पनवेल नगरपालिका आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील आकडेवारीवरून उघड झाले आहे.

In Panvel, women's birth rate is low | पनवेलमध्ये स्त्री जन्मदर कमीच

पनवेलमध्ये स्त्री जन्मदर कमीच

पनवेल : शहरीबहुल समजल्या जाणाऱ्या पनवेल परिसरात स्त्री जन्मदर कमी असल्याचे पनवेल नगरपालिका आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागातील आकडेवारीवरून उघड झाले आहे. एक हजार मुलांपाठीमागे ९०० मुली जन्माला येत असल्याचे उघड झाले आहे.
ग्रामीण भागाबरोबर शहरातही तीच परिस्थिती असून यासंदर्भात नागरिकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचे मत ‘बेटी बचाओ’साठी काम करणाऱ्यांचे म्हणणे आहे. पनवेल परिसरात विविध विकास प्रकल्प आले आहेत. पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने उपलब्ध झाल्याने याठिकाणची लोकसंख्या दिवसेन्दिवस वाढतच आहे. नोकरदार महिलांची संख्याही अधिक असून मुलींचा जन्मदर मात्र कमी असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मध्यंतरी केलेल्या सर्व्हेनुसार, राज्यात ६ हजार ९३० सोनोग्राफी मशिन होत्या. त्यापैकी दीड हजार रायगड आणि नवी मुंबई परिसरात होत्या. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मशिनच्या संख्या जास्त, त्या ठिकाणी मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत असल्याचे समोर आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गर्भनिदान कायदा देखरेख समितीच्या अध्यक्षा वर्षा देशपांडे यांनी स्ट्रिंग आॅपरेशन करून अनेक वैद्यकीय व्यावसायिकांना तुरुंगाची हवा खाण्यास पाठवले होते. मात्र नवी मुंबई आणि रायगड परिसरात अशाप्रकारे धाडसत्र फारशी झालेली नाहीत. काही दिवसांपूर्वी सोनोग्राफी मशीनच्या नोंदणीचे नूतनीकरण न करणे, माहिती व्यवस्थित न ठेवणे त्यामुळे संशयाची सुई असलेल्या दोन डॉक्टरांना पनवेल न्यायालयाने सजाही ठोठावली.
एका संस्थेच्या वतीने जिल्ह्यात लेक लाडकी अभियान राबवून एक वा दोन मुली असलेल्या पालकांचा सन्मान केला होता. शिवाय सखी तुझ्यासाठी या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत जनजागृती करण्यात आली, मात्र संस्थेचे संस्थापक अभिजित माळी यांच्या पश्चात हे काम मागे पडले. २०११ साली या परिसरातील जनगणनेनुसार महिलांचे प्रमाण एक हजारी पुरुषामागे ९०० च्याही खाली गेले आहे. २००८ साली हे प्रमाण ९४१ इतके होते. आता ७६ ने कमी होऊन ८६५ वर आले आहे. पनवेल तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी शिक्षिका आणि सेविका ६ महिने ते ६ वर्षे या वयोगटातील बालकांचा सर्व्हे करतात. सध्या प्रकल्प-१ मध्ये २० हजार बालके आहेत. त्यापैकी १०,५०० पेक्षा जास्त मुले आहेत तर ९,५०० पेक्षा कमी मुली आहेत.
पनवेल नगरपालिका हद्दीत पनवेल, नवीन पनवेल आणि खांदा वसाहतींचा समावेश होतो. या भागात गेल्या वर्षी ५७७९ बालके जन्मली. त्यापैकी ३००७ मुले आणि २७७२ मुली आहेत. मुला-मुलींमधील ही तफावत अत्यंत चिंतादायक असल्याची प्रतिक्रि या सामाजिक कार्यकर्त्या वंदना बामणे यांनी दिली. (प्रतिनिधी)

पनवेलसारख्या शहरात मुलींचे जन्मदर कमी असणे ही शोकांतिका आहे. याकरिता नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. बेटी बचाओ या उपक्रमासाठी शासनाकडूनही विविध उपाययोजना राबविण्यात येत असून सुकन्या योजनेचा लाभ सर्व मुलींसाठी फायदेशीर आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही स्त्री-पुरुष समानतेबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
- निवेदिता श्रेयन्स,
जनसंपर्क अधिकारी, पिल्लाई कॉलेज

Web Title: In Panvel, women's birth rate is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.