धाबेवाडीत पाण्यासाठी पायपीट
By Admin | Updated: May 31, 2016 03:16 IST2016-05-31T03:16:56+5:302016-05-31T03:16:56+5:30
तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वर्षानुवर्षे सुरूच आहे.

धाबेवाडीत पाण्यासाठी पायपीट
कर्जत : तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वर्षानुवर्षे सुरूच आहे. तेथे पाणी साठवण करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने तेथील आदिवासी महिलांना दोन ते तीन मैल डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे.
नांदगाव रस्त्यावर धाबेवाडी ही आदिवासी समाजाची ४० घरांची वस्ती असलेली वाडी आहे. खांडस ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या या वाडीमध्ये पिण्याचे पाणी साठवून ठेवणारी कोणतीही व्यवस्था नाही. शासनाच्या कोणत्याही व्यवस्थेने धाबेवाडीमध्ये विहीर खोदली नाही, अथवा पाणी योजना राबविली नाही. त्यामुळे या वाडीतील महिला डोक्यावर हांडे घेऊन रस्त्याच्या कडेने बांगारवाडीमध्ये असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात असतात. ते अंतर दीड किलोमीटरचे असून धाबेवाडीमधील महिलांची पायपीट वर्षानुवर्षे थांबण्याचे नाव घेत नाही.
मागील तीन महिन्यांपासून बांगारवाडीची विहीर देखील कोरडी पडल्याने त्या विहिरीमध्ये पाण्याचे टँकर खासगी संस्था आणि शासनाच्या वतीने टाकले जातात. मात्र ते टँकर दररोज येत नसल्याने धाबेवाडीमधील महिलांना अन्य पर्याय म्हणून घुटेवाडी येथील विहिरीवर पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागते. घुटेवाडीपासून धाबेवाडी हे अंतर तब्बल तीन किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे धाबेवाडीमधील महिलांची मागील काही महिन्यात पाण्यासाठी धावपळ वाढली आहे. धाबेवाडीमध्ये शासनाने एखादी विहिर असती तर पाणीटंचाईच्या काळात धाबेवाडीमधील विहिरीमध्ये टँकरचे पाणी टाकण्याची सोय झाली असती असे मत आदिवासी ग्रामस्थ गजानन पारधी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे. (वार्ताहर) महाड : वाढते तापमान तसेच गतवर्षी झालेला कमी पाऊस यामुळे नद्या, नाले, विंधन विहिरी हे पाण्याचे स्रोत आटल्यामुळे दरवर्षीप्रमाणे महाड तालुक्यातील १४ गावांसह ११७ वाड्यांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या १३१ ठिकाणी केवळ नऊ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत असून, हे टँकर्स अपुरे पडत आहेत. जून महिन्याच्या तोंडावर तर टंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे.
कोथुर्डे धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्यामुळे या धरणाच्या पाण्यावर आधारित असलेल्या नाते, आचळोली, दासगांव, आचळोली, नांदगाव, मोहोप्रे, कोळोसे, नांदगाव खुर्द, गांधारपाले, वहूर, केंबुर्ली, काचले, चापगाव, लाडवली, करंजखोल, गोंडाळे, तळोशी, मांडले, पाखाडी, केंबुर्ली, आढी, डोंगरोली या गावांना तसेच तेथील वाड्यांतील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र टँकरच्या अपुऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महाड तालुक्यात दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनांवर खर्च केले जातात. मात्र महाड तालुका टँकरमुक्त करण्याऐवजी टँकरमुक्त गावे आणि वाड्यांची संख्या दरवर्षी वाढतच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाड शहराला मात्र या टंचाईची झळ पोहोचलेली नाही. नगर परिषदेचे पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यामुळे शहरवासीयांना सध्या मुबलक पाणीपुरवठा करण्यात नगर परिषद प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत आहे.