Opposition to Homecoming at Bus Terminus; Cidco's home construction | बस टर्मिनसवरील गृहप्रकल्पाला विरोध; सिडकोची गृहनिर्मिती
बस टर्मिनसवरील गृहप्रकल्पाला विरोध; सिडकोची गृहनिर्मिती

- अरुणकुमार मेहत्रे 

कळंबोली : सिडकोकडून बस टर्मिनसवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यात येणार आहेत. या ठिकाणी पंधरा माळ्यांचा टॉवर उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी काही ठिकाणी पत्रे मारून संबंधित ठेकेदाराने जागा ताब्यात घेतले आहे. ऐन मोक्याच्या ठिकाणी होणाऱ्या गृहप्रकल्पामुळे परिसरात गर्दी वाढणार आहे. शिवाय मोकळी जागाच शिल्लक राहणार नसल्याने रहदारीतही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रस्तावित गृहप्रकल्पास विरोधाचे वातावरण तयार होत आहे.

सिडकोने वसाहती निर्माण करताना, वेगवेगळ्या कारण्यासाठी काही भूखंड राखीव ठेवले आहे. त्यामध्ये बस टर्मिनसकरितासुद्धा प्रत्येक वसाहतीत भूखंड आरक्षित आहेत. यात खांदेश्वर, मानसरोवर रेल्वे स्थानकासमोरसुद्धा बस टर्मिनसचे भूखंड आहेत. खांदा वसाहतीत सेक्टर ८ येथे भूखंड क्रमांक ११ येथे ५,५०० चौरस मीटरची जागेवर बस टर्मिनसचे नियोजन आहे. मात्र, अनेक वर्षांपासून बसस्थानक न झाल्याने ही जागा मोकळी होती. या ठिकाणी सुरू असलेले भाजीमार्केट, मच्छीमार्केटवर काही दिवसांपूर्वी तोड कारवाई करण्यात आली.
सिडकोने या ठिकाणी टर्मिनस आणि त्यावर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत टॉवर बांधून गृहप्रकल्प निर्मितीचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यानुसार, निविदा प्रक्रियाही पार पडली असून, ठेकेदारही नियुक्त झाला आहे.

खांदा वसाहत आणि खांदेश्वर रेल्वे स्थानक या ठिकाणी पत्रे लावून बांधकाम कंपनीने जागा ताब्यात घेतली आहे. टॉवर बांधले जाणार असल्याने आजूबाजूच्या सोसायट्यांमधील रहिवाशांचा श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे. शिवाय खांदा वसाहतीत प्रस्तावित टर्मिनसला पुरेशी जागा नाही, या ठिकाणी अवजड वाहनांची वर्दळ वाढल्यास वाहतूककोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याचे वसाहतीतील रहिवाशांचे म्हणणे आहे.

सिडकोने आपल्या नियोजनामध्ये फक्त बस टर्मिनस दाखविले होते. आता या ठिकाणी गृहप्रकल्प राबवून पैसे कमावण्याचे धोरण अवलंबले आहे. भविष्यात लोकवस्ती वाढल्यास पाणीटंचाई, वाहतूककोंडीबरोबरच अन्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
ऐन रहदारीच्या रस्त्यावर बस स्थानक आणि वरती गृहप्रकल्प अतिशय गुंतागुंतीचा होणार असल्याची प्रतिक्रिया येथील परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिली.

अकरा माळ्यांचे १४ टॉवर्स

खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. सेक्टर २८ येथे ४४,७१६ चौरस मीटरचा भूखंड आहे. त्यावर १,५३,६१४ चौ.मी. इतके बांधकाम येथे केले जाणार आहे. ११ माळ्यांचे १४ टॉवर्स या ठिकाणी बांधले जाणार आहेत. त्यामध्ये १,५६२ इतके घरे आहेत. ही जागा भविष्यात रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्याकरिता आवश्यक आहे. अन्यथा मुंबई प्रमाणे याही रेल्वे स्थानकाची अवस्था होईल. शिवाय पार्किं गचाही प्रश्न गंभीर होणार आहे, तसेच कामोठे येथून रेल्वे स्टेशनवर येणाºया-जाणाºया रेल्वेप्रवाशांना वळसा घालून जावे लागत आहे. त्याचबरोबर, समोरील सर्व सेक्टर या प्रकल्पामुळे झाकले जाणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी सचिन गायकवाड यांनी सिडकोच्या मुख्य अभियंत्याकडे केली आहे.

पायाभूत सुविधा कुठून आणणार

सध्याच्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी सिडको नागरिकांना देऊ शकत नाही. त्यामुळे कळंबोली, पनवेलमधील अनेक विभागांत आजही पाणीटंचाई, अल्पदाबाने पाणीपुरवठ्याची समस्या आहे. आता सिडको हजारो घरे बांधत आहे. त्यांना पाणी देणार कुठून, असा सवाल अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर यांनी केला आहे. लोकवस्ती वाढल्यास, ड्रेनेज, कचरा, अरुंद रस्त्यांमुळे वाहतूककोंडी या समस्याही डोके वर काढण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. सिडको घरे बांधून मोकळे होईल, परंतु त्याचा ताण महापालिकेवर येईल, असे मतही अ‍ॅड. क्षीरसागर यांनी मांडले आहे.

सिडकोने बस डेपोच्या जागेवर घरे बांधण्यासाठी काम सुरू केले आहे, परंतु या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम, पार्किंगसाठी सिडकोने जागा दिली नाही. फेरीवाल्यांचे पुनर्वसन तसेच राहिले आहे. मात्र, घरे बांधण्याकरिता सिडको अधिक पुढाकार घेत आहे. सिडकोच्या या भूमिका योग्य नाहीत.
- सीता पाटील, नगरसेविका, पनवेल महापालिका

सर्वसामान्य, तसेच अल्प उत्पन्न गटातील लोकांना घरे मिळावी, याकरिता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडकोने बस टर्मिनसच्या वरती घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. खाली बस टर्मिनस असणार आहेत.
- संजय चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको
 

Web Title: Opposition to Homecoming at Bus Terminus; Cidco's home construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.