रिटघरमध्ये ‘एक गाव, एक गणपती’, ४३ वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 05:12 IST2017-08-28T04:12:15+5:302017-08-28T05:12:29+5:30
पनवेल तालुक्यातील रिटघर या गावामध्ये ४३ वर्षांपासून एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. जवळपास बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात सर्व जण मतभेद विसरून गणपतीच्या आरतीला

रिटघरमध्ये ‘एक गाव, एक गणपती’, ४३ वर्षांची परंपरा
पनवेल : पनवेल तालुक्यातील रिटघर या गावामध्ये ४३ वर्षांपासून एकच गणपती बसविण्याची परंपरा आहे. जवळपास बाराशे लोकसंख्या असलेल्या गावात सर्व जण मतभेद विसरून गणपतीच्या आरतीला, तसेच गणेशाच्या सेवेला हजर होतात. २०१६चा विघ्नहर्ता पुरस्कारदेखील या रिटघरच्या राजाला मिळाला आहे.
रिटघर येथे १९७४मध्ये पहिल्यांदा एक गाव, एक गणपतीची संकल्पना मांडण्यात आली व त्याच वर्षापासून गावातील मंदिरात एक गणपती बसविण्यात आला. अनाठायी होणारा खर्च कमी व्हावा व आनंदाची प्राप्ती व्हावी, तसेच संपूर्ण गाव एकत्रित यावा, यासाठी हभप भागोजी महाराज सांगडे, परळी वैजनाथ पांडुरंग महाराज, हभप धोंडू भोपी, बाळू भोपी, शंकर भोपी, मुंगा पाटील (सर्व मयत) यांनी एक गाव, एक गणपती सुरू केला. गावातील हनुमान मंदिरात दरवर्षी गणेशाची मूर्ती बसविली जाते. मंदिरात सर्व अबालवृद्ध, ग्रामस्थ, लहान-मोठे, महिला हजर असतात. यंदा पंढरपूरचा देखावा साकारण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक परंपरेच्या कार्यक्रमांतर्गत आरती, पारायण, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण अशा पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागात शक्यतो घरोघरी गणपती बसविण्याची प्रथा आहे. मात्र, रिटघर गावाने ‘एक गाव, एक गणपती’ ठेवून समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गावातील ग्रामस्थ भजन, कीर्तन, आदींसह परंपरागत बाल्या नृत्याचे कार्यक्रम या ठिकाणी करत असतात. गावातील प्रत्येकाला गणेशाच्या सेवेचा लाभ मिळावा म्हणून काही घरांतील नागरिकांना गणपतीच्या सेवेसाठी नेमले जाते.