मोबाईल चोरल्याच्या संशयातून एकाची हत्या; माजी नगरसेवकासह एकाला अटक
By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 7, 2025 14:14 IST2025-11-07T14:06:41+5:302025-11-07T14:14:40+5:30
मोबाईल चोरीच्या संशयावरुन डांबून ठेवी केली होती मारहाण

मोबाईल चोरल्याच्या संशयातून एकाची हत्या; माजी नगरसेवकासह एकाला अटक
नवी मुंबई : मोबाईल चोरीच्या संशयातून माजी नगरसेवक व त्याच्या सहकाऱ्याने एकाची हत्या केल्याची घटना तुर्भे स्टोअर येथे घडलो आहे. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. सार्वजनिक शौचालयाच्या खोलीत त्याला डांबून ठेवून चार ते पाच तास मारहाण करत होते.
तुर्भे स्टोअर येथील सार्वजनिक शौंचालयात ही घटना घडली आहे. शौचालयापासून काही अंतरावर गुरुवारी दुपारी सुधाकर पाटोळे (३४) हा तरुण जखमी अवस्थेत मिळून आला होता. त्यास रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. या घटनेप्रकरणी तुर्भे पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यामध्ये माजी नगरसेवक अर्जुन अडागळे व सार्वजनिक शौंचालयाची देखभाल करणाऱ्या विधान मंडल यांची नावे समोर आली.
अर्जुन अडागळे याचा मोबाईल चोरीला गेला होता. याबाबत त्यांना सुधाकर पाटोळे याच्यावर संशय होता. यातून त्यांनी मंडल याच्या मदतीने सुधाकर याला तुर्भे स्टोअर येथील शौंचालयाच्या वरती मंडल याच्या राहत्या जागेत नेले. त्याठिकाणी सुधाकर याला डांबून ठेवून सुमारे चार ते पाच तास मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह रस्त्यालगत आणून टाकला होता. याप्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक अडागळे व मंडल दोघांवरही गुन्हा दाखल करून गुरुवारी रात्री अटक केल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले.