दरवाजाबाहेरूनच ‘ओम नमः शिवाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:19 AM2021-03-12T00:19:04+5:302021-03-12T00:19:18+5:30

रायगडमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन : ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त

‘Om Namah Shivaya’ right outside the door | दरवाजाबाहेरूनच ‘ओम नमः शिवाय’

दरवाजाबाहेरूनच ‘ओम नमः शिवाय’

googlenewsNext

रायगड जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात कोरोनाचे नियम पाळून साजरा झाला. शासनाने मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याने गुरुवारी सर्व मंदिरांचे दरवाजे बंद होते. त्यामुळे भाविकांनी दरवाजा बाहेरूनच महादेवाचे दर्शन घेतले. बम बम भोलेचा गजर झाला; मात्र शांततेत आणि साधेपणाने महाशिवरात्री साजरी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क 
कर्जत :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री असल्याने कर्जत तालुक्यातील महादेवाच्या प्रत्येक मंदिरात भाविकांनी गाभाऱ्यात न जाता बाहेरूनच दर्शन घेतले. तालुक्यातील प्रत्येक मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी भाविक उपस्थित होते. बहुतांश मंदिरामध्ये मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच मंदिरांमध्ये शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. बहुतांश ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कर्जत शहरातील श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. मंदिरात हभप श्रीराम पुरोहित यांचे तीन दिवस कीर्तन ठेवण्यात आले होते. तर महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला हभप दिलीप महाराज राणे यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे श्री कपालेश्वराची महापूजा करण्यात आली. त्यांनतर समीर डोंबे यांच्या हस्ते सपत्निक लघुरुद्ध अभिषेक करण्यात आला. सकाळी महिलांचे सामूहिक शिवलीलामृत पारायण झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्यात दर्शनासाठी मनाई असल्याने बाहेरूनच भाविकांनी दर्शन घेतल्याने होणारी गर्दी टळली. दरवर्षी पुणे येथील तुपे बंधू यांचा सनई चौघड्यांचा सुमधुर संगीत मंदिरात असे यंदा तो नव्हता त्यामुळे अनेक वर्षांपासूनची परंपरा यंदा कोरोनाच्या संकटामुळे खंडित झाली.
दरवर्षी सायंकाळी श्री कपालेश्वराची पालखी मिरवणूक ढोल-ताशा पथकाच्या गजरात काढण्यात येते ही परंपरा यंदा खंडित झाली. पालखीचे पूजन करून पालखी मंदिराबाहेर चौकात आणून लगेचच मंदिरात आणण्यात आली. 

कोल्हारे येथे त्रिवेणी संगमावर असलेल्या पांडवकालीन शिवमंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक उपस्थित होते. याशिवाय कर्जत तालुक्यातील सर्वच शिवमंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री साजरी करण्यात आली. कोषाणे, साळोख, तमनाथ, माथेरान, मानिवली, बिरदोले, शेलू, धामोते येथील धनेश्वरी आणि मिरकुटे यांचे खासगी मंदिर, नेरळमधील कुसुमेश्वर मंदिर, निर्माण नगरी येथील शिवमंदिर, मोहाचीवाडी, भडवळ, कळंब, पोही, खांडस, देवपाडी, वंजारपाडा, गुढवण, कशेळे, वारे, कोठिंबे, आंबिवली, मांडवणे, चांदई, कडाव, बीड, देऊळवाडी आदी ठिकाणी असलेल्या शिवमंदिरात भक्तांनी मनोभावे दर्शन घेतले. माथेरान येथील पिसरनाथ महाराज तसेच कर्जत शहरातील धापया आणि कपालेश्वर येथील मंदिरात शिवरात्रीनिमित्य भाविकांची उपस्थिती होती. सर्वच ठिकाणी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

Web Title: ‘Om Namah Shivaya’ right outside the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.