शिकलगार टोळीतील कुप्रसिद्ध घरफोड्यास अटक; सव्वाबारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By नारायण जाधव | Updated: December 30, 2023 18:26 IST2023-12-30T18:26:19+5:302023-12-30T18:26:36+5:30
फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार वाशी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद केला होता.

शिकलगार टोळीतील कुप्रसिद्ध घरफोड्यास अटक; सव्वाबारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई : कुप्रसिद्ध शिकलगार टोळीतील एका सराईत घरफोड्यास वाशी पोलिसांनी त्याला दोन दिवस वेषांतर करून अटक केली असून, त्याच्याकडून ४ गुन्ह्यांची उकल झाली असून, १२ लाख ३० हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ससपाल सिंग उर्फ पापा तारासिंग कलानी असे अटक आरोपीचे नाव आहे. वाशीतील रहिवासी अश्विनी प्रसाद यांच्या घरातून शिकलगार टोळीने सोन्याचे व चांदीचे दागिने चोरी केले होते. याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार वाशी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी एक पथक नेमले होते. त्यात सहायक पोलिस निरीक्षक पवन नांद्रे, सत्यवान बिले, पोलिस हवालदार चिकणे, वारिंगे, पोलिस नाईक चंदन मस्कर, संदीप पाटील, ठाकूर, पोलिस शिपाई अमित खाडे यांचा समावेश होता.
या पथकाने तपास करताना गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यासाठी नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील पोलिस ठाण्यातील अभिलेख तपासले होते. तसेच आरोपी हे गुन्हा करतेवेळी घटनास्थळी मुखपट्टी, हातमोजे घालून आल्याने त्यांची ओळख पटवणे अत्यंत जिकिरीचे होते. आरोपींनी गुन्हा करताना पांढऱ्या रंगाच्या झेन गाडीचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यात एक अडचण होती. आरोपी गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने ही काही अंतरावर गेल्यानंतर बदलत होते. त्यामुळे माग काढणे अवघड झाले होते.
४०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
मात्र, आरोपी पळून गेलेल्या मार्गातील सुमारे ३५० ते ४०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर तो कुठे राहतो त्याबाबत ठोस माहिती मिळाली. तसेच आरोपी शिकलगार टोळीचा सूत्रधार असल्याचे समोर आले. यामुळे त्याच्या घराच्या आसपास दोन दिवस वेषांतर करून सापळा रचून अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
हत्येच्या गुन्ह्यातून आला आहे बाहेर
अटक आरोपी हा हत्येच्या गुन्ह्यातून २०२२ मध्ये कारागृहातून बाहेर आला होता. याशिवाय २०१५ मध्ये वाशी पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी करताना एका महिलेच्या डोक्यात लोखंडी गजाचा घाव करून तिची हत्या केली होती. या गुन्ह्यात कलानी याचा सहभाग असल्याचेही समोर आले. वाशीतील गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक मोटरसायकल तसेच घरफोडीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे तसेच गाड्यांच्या वेगवेगळ्या बनावट क्रमांकाच्या पाट्या हस्तगत केल्या आहेत. या टोळीने नेरुळ परिसरातून एक इको कार तसेच एक झेन कार चोरी करून त्यांचा वापर चोरी करण्यासाठी केल्याचे चौकशीतून समोर आले आहे, कलानी याच्याकडून आतापर्यंत २५ तोळे सोने तसेच नेरुळ पोलिस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या दोन कार असा एकूण १२ लाख ३० हजार ४३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.