वर्ल्डकप फायनलमुळे महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर सामसूम

By नामदेव मोरे | Published: November 19, 2023 04:54 PM2023-11-19T16:54:14+5:302023-11-19T16:54:32+5:30

पामबीच रोडवरही सन्नाटा, दुपारी दोननंतर नागरिकांची वर्दळही थांबली

no people vehicles on major roads including highways due to World Cup finals | वर्ल्डकप फायनलमुळे महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर सामसूम

वर्ल्डकप फायनलमुळे महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर सामसूम

नवी मुंबई : रविवारची सुट्टी असल्यामुळे नवी मुंबईमध्ये दुपारपर्यंत नागरिकांची वर्दळ सुरू होती. परंतु वर्ल्डकपची फायनल सुरू होताच सायन - पनवेल महामार्ग, पामबीच रोड, ठाणे बेलापूर रोडसह अंतर्गत रस्त्यांवरील वर्दळ अचानक थांबली होती. सर्व प्रमुख रस्त्यांवर तुरळक वाहतूक सुरू होती. सर्व बाजारपेठांमध्येही शांततेचे वातावरण निर्माण झाले होते.

नवी मुंबईमधील वातावरणही आज क्रिकेटमय झाले होते. सकाळपासून शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांचा वावर सुरू होता. रोडवरील वाहतूकही सुरळीत होती. परंतु दोन वाजेपासून रोडवर सन्नाटा निर्माण झाला होता. पामबीच रोडवरील वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. वाहनांची संख्या रोडावली होती. कोरोनाकाळाप्रमाणे रस्ते मोकळे झाले होते. सायन-पनवेल महामार्गावरही नेहमीपेक्षा वाहनांची संख्या अत्यंत कमी होती. कामानिमीत्ताने घराबाहेर पडलेले नागरिकही मोबाईलवर मॅच पाहात असल्याचे दिसत होते. ज्यांच्याकडे मोबाईल नाही ते इतरांना स्कोर काय झाला याची विचारपूस करत होते.

बेलापूर, सीवूड, नेरूळ, वाशी ते ऐरोली दिघा पर्यंत सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. दुकानांमध्ये ग्राहक दिसत नव्हते. टी व्ही सुरू असलेल्या दुकानांच्या बाहेर प्रेक्षकांची गर्दी झाली होती. शहरातील अंतर्गत रोडवरील वाहतूकही मंदावली होती.

सर्वत्र चर्चा सामन्याची
नवी मुंबईमध्येही घराबाहेर पडलेले नागरिक मोबाईलवर मॅच पाहणाऱ्याजवळ जावून स्कोर काय झाला याची विचारपूस करत होते. संपूर्ण शहरातील वातावरण क्रिकेटमय झाल्याचे पहावयास मिळत असून सर्वत्र मॅचची चर्चा सुरू होती. सुरवातीच्या विकेट झटपट पडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात असल्याचेही पहावयास मिळत होते.

Web Title: no people vehicles on major roads including highways due to World Cup finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.