एनएमएमटीचे गेल्या पाच वर्षांत 639 अपघात, वीस जणांचा मृत्यू ; ५३ गंभीर तर १११ किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 00:10 IST2021-02-06T00:06:21+5:302021-02-06T00:10:42+5:30
Navi Mumbai News : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) माध्यमातून शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे.

एनएमएमटीचे गेल्या पाच वर्षांत 639 अपघात, वीस जणांचा मृत्यू ; ५३ गंभीर तर १११ किरकोळ जखमी
- योगेश पिंगळे
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) माध्यमातून शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. शहरात वाढलेली वाहनांची संख्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे एनएमएमटीचे गेल्या पाच वर्षांत गंभीर, किरकोळ असे सुमारे ६३९ अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून ५३ नागरिक गंभीररीत्या तर १११ नागरिक किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
नवी मुंबई शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई परिवहन सेवा सुरू करण्यात आली. नवी मुंबई शहराबरोबर शेजारील शहरांमध्ये एनएमएमटीचे जाळे पसरले आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहनांची वर्दळ वाढली असून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. शहरात वाहने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक ठिकाणी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कडेला बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होऊन लहान-मोठे अपघात घडतात. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहतूक आणि नागरिकांची गर्दी कमी असल्याने मागील पाच वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी अपघातांचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी एकूण ७० अपघात घडले. त्यात सात नागरिक गंभीर तर २० नागरिक किरकोळ जखमी झाल्याचा घटना घडल्या आहेत.