कार्यकर्ते प्रचाराबाबत निरुत्साही, नवी मुंबईतील नेत्यांची बैठकांसह रॅलीसाठी धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:32 PM2019-04-14T23:32:37+5:302019-04-14T23:33:08+5:30

ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १३ दिवस राहिले असूनही नवी मुंबईमध्ये अद्याप प्रचाराला गती आलेली नाही.

Nirubashi for promotion of activists, running rounds for meeting with leaders of Navi Mumbai | कार्यकर्ते प्रचाराबाबत निरुत्साही, नवी मुंबईतील नेत्यांची बैठकांसह रॅलीसाठी धावपळ

कार्यकर्ते प्रचाराबाबत निरुत्साही, नवी मुंबईतील नेत्यांची बैठकांसह रॅलीसाठी धावपळ

googlenewsNext

नवी मुंबई : ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १३ दिवस राहिले असूनही नवी मुंबईमध्ये अद्याप प्रचाराला गती आलेली नाही. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. अद्याप घरोघरी संपर्काची एक फेरीही पूर्ण झालेली नाही. नेते रॅलीसह बैठकांमध्ये व्यस्त असून, कार्यकर्त्यांमधील निरुत्साह सर्वांसाठीच डोकेदुखी ठरला आहे.
मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या उमदेवाराचा प्रचार वेगाने सुरू आहे. पनवेलसह उरणमध्ये नेत्यांसह कार्यकर्तेही उत्साहाने प्रचार करत असताना, दुसरीकडे नवी मुंबईमधील बेलापूर व ऐरोली मतदारसंघामध्ये अद्याप प्रचारामध्ये उत्साह निर्माण झालेला नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेऊन कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. ऐरोली मतदारसंघामध्ये उमेदवार आनंत परांजपे यांच्या रॅलीचेही आयोजन केले जात आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीही काँगे्रस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. शिवसेनेचे राजन विचारे यांच्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळावा घेऊन कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असे आवाहन केले आहे. स्वत: विचारे यांच्यासह विजय नाहटा, आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले आहेत.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन व नागरिकांच्या भेटी घेण्याचे आवाहन केले आहे; प्रत्यक्षात कार्यकर्ते प्रचारात उतरलेले नाहीत. अनेक कार्यकर्त्यांपर्यंत प्रचाराचे साहित्यही पोहोचलेले नाही. रविवारची सुट्टी असल्यामुळे नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे शक्य होते; परंतु कोणत्याच प्रभागामध्ये स्थानिक कार्यकर्ते प्रचार करताना दिसले नाही.
प्रचाराविषयी माहिती घेण्यासाठी प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली असता अद्याप घरोघरी प्रचार सुरू झालेला नसल्याचे मान्य केले. कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. सर्वांना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले आहे; पण सोशल मीडियावरून उमेदवाराची माहिती पाठविण्यावरच अद्याप सर्वांचा भर आहे. प्रभागांमधील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याचे सांगण्यात आले. काही पदाधिकारी, प्रचार साहित्य मिळाले नसल्याचे सांगत आहेत. कार्यकर्त्यांमधील हा निरूत्साह नेत्यांसाठी डोकेदुखी बनला असून, पुढील १३ दिवसांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे, अशा सूचना पदाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.
>मतदानाची तारीखही माहिती नाही
नवी मुंबईमधील नागरिकांपर्यंत उमेदवारांची माहिती पोहोचविण्यामध्ये कार्यकर्ते अपयशी ठरले आहे. अनेक नागरिकांना अद्याप मतदानाची तारीखही माहिती नाही. नागरिकांशी चर्चा केली असता काही जण २३ तारखेला मतदान असल्याचे सांगू लागले आहेत. निवडणूक विभागासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी नागरिकांच्या मनावर मतदानाची तारीख बिंबविण्यातही अपयशी ठरले आहेत.
>परवानग्यांसाठी धावपळ
प्रचारासाठी रॅली व सभांना परवानग्या मिळविणे सुलभ व्हावे यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली आहे. विधानसभा क्षेत्रातील निवडणूक विभागाच्या कार्यालयामध्ये त्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे; परंतु प्रत्यक्षात रॅलीसाठी परवानगी घेण्यासाठी कार्यकर्त्यांना संंबंधित पोलीस स्टेशनमध्ये पाठविले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ होऊ लागली आहे.
>नेत्यांभोवती घुटमळत आहेत कार्यकर्ते
प्रचारासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या प्रभागावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश पदाधिकारी नेत्यांची बैठक असलेल्या ठिकाणी घुटमळताना दिसत आहेत. रॅलीत व इतर ठिकाणी नेत्यांना व उमेदवारांना आपण दिसू याची काळजी घेतली जात आहे. नेत्यांभोवती फिरण्यापेक्षा प्रभागामधील घरोघरी जाण्याच्या सूचना देऊनही अद्याप फारसा फरक पडलेला नाही.
>रविवारची संधीही गेली
नवी मुंबई परिसरामधील बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसायासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिक घरी असतात. शनिवारी रामनवमीची सुट्टी व रविवारची साप्ताहिक सुट्टी असतानाही एकाही राजकीय पक्षाचे उमेदवार नागरिकांच्या घरापर्यंत पोहचलेले नाहीत.

Web Title: Nirubashi for promotion of activists, running rounds for meeting with leaders of Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.