कल्याणच्या २७ गावांसाठी नवी पालिका
By Admin | Updated: December 31, 2014 01:54 IST2014-12-31T01:54:24+5:302014-12-31T01:54:24+5:30
कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांच्या विकासासाठी एखादी नगर परिषद करता येईल काय, याचा विचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

कल्याणच्या २७ गावांसाठी नवी पालिका
मुंबई : कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांच्या विकासासाठी एखादी नगर परिषद करता येईल काय, याचा विचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. ह्या परिसरात होणारा विकास लक्षात घेता, या भागात परवडणारी घरे योजना लागू करावी, यादृष्टीनेही नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रालगतच्या २७ गावांच्या आणि भिवंडी परिसरातील ६० गावांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी देण्याचा निर्णय फडणवीस यांनी मंगळवारी घेतला, त्या वेळी ते बोलत होते.कल्याण येथे सोमवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांच्या विकास आराखड्याचा प्रश्न दोन दिवसांत सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात नगरविकास विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नगररचना संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती. या विकास आराखड्याबाबत नगरविकास विभागामार्फत सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे दोन्ही विकास आराखडे मंजूर करण्याचा निर्णय घेतला. बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे, नगररचना संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की मुंबईलगतचा हा परिसर असल्याने झपाट्याने विकास होत आहे. या भागात दळणवळणाच्या सुविधा, सांडपाणी निचरा व्यवस्था, रस्ते आदी विकास योजनांचे नियोजन पुढील २० वर्षांच्या लोकसंख्येचा आणि विकासाचा दर लक्षात घेऊन करावे, असेही ते म्हणाले.
लॉजिस्टिक हब व्हावा : भिवंडी परिसरालगतच्या ६० गावांच्या विकास योजनेच्या आराखड्यासही सविस्तर चर्चेअंती मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिसरात लॉजिस्टिक हब विकसित झाल्यास राज्य शासनाच्या महसुलात वाढ होईल़ त्या दृष्टीने नियोजनाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.