पनवेलच्या महापौरांच्या ताफ्यात नवी कोरी इनोव्हा, ही तर पैशांची उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:38 IST2021-03-12T00:37:46+5:302021-03-12T00:38:03+5:30
ही तर पैशांची उधळपट्टी

पनवेलच्या महापौरांच्या ताफ्यात नवी कोरी इनोव्हा, ही तर पैशांची उधळपट्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पालिकेच्या स्थापनेनंतर खरेदी केलेली होंडा सिटी गाडी बंद पडत असल्याने पनवेल महानगरपालिकेने महापौरांसाठी सुमारे २० लाखांची इनोव्हा क्रिस्टा गाडी खरेदी केली आहे. गुरुवार, ११ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या गाडीचा लोकार्पण सोहळा पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पार पडला.
पनवेल महानगरपालिका बाल्यावस्थेत असल्याचे आपण वारंवार प्रशासन अथवा सत्ताधारी यांच्याकडून ऐकत असतो. एकीकडे पालिकेला मालमत्ता कराव्यतिरिक्त कोणतेही नवीन उत्पन्नाचे साधन नाही. मालमत्ता कराच्या नव्या प्रणालीमुळे अनेकांनी कर भरण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न मालमत्ता कराच्या कचाट्यात सापडले असताना अशा प्रकारे केवळ महापौरांसाठी २० लाख रुपये खर्चून नवीन गाडी घेणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वापरात असलेली गाडी वारंवार बंद पडत असल्याने नवी गाडी खरेदी करण्यात आल्याचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले. मात्र होंडा सिटीसारखी गाडी दोन ते तीन वर्षांत बंदच कशी पडू शकते, असाही प्रश्न या वेळी उपस्थित होत आहे. पालिका मुख्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, साहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव उपस्थित होते.
ही तर पैशांची उधळपट्टी
एकीकडे कोरोनाची महामारी त्यात मालमत्ता कराचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना महापौरांना लाखो रुपये खर्चून गाडी खरेदीची इच्छा निर्माण होणे हा पनवेलकरांचा अपमान आहे. अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी थांबली पाहिजे.
- प्रीतम म्हात्रे,
विरोधी पक्ष नेते