ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:51 IST2025-05-04T06:51:03+5:302025-05-04T06:51:12+5:30

कार्यक्रमासाठी हजारो वाहने नेरूळ विभागात आल्याने नेरूळ, जुईनगर मुख्य रस्त्यांसह अंतर्गत परिसरातही वाहतूककोंडी झाली.

Nerulkar's faced traffic jam due to a r Rahman's live concert | ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नेरूळ येथील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये शनिवारी संगीतकार ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टच्या आयोजनामुळे नेरूळकरांची पुरती कोंडी झाली. स्टेडियम परिसरातील  राहणाऱ्यांचे संध्याकाळी घरी जाणे, घरातून बाहेर पडणे कठीण झाले होते. 

कार्यक्रमासाठी हजारो वाहने नेरूळ विभागात आल्याने नेरूळ, जुईनगर मुख्य रस्त्यांसह अंतर्गत परिसरातही वाहतूककोंडी झाली. पार्किंगची सुविधा नेरूळमधील मैदानांमध्ये केली होती. कार्यक्रमाला सुरुवात होताना काही वेळ जुईनगर, शिरवणेफाटा, एलपी, उरणफाटा आदी ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. पारिजात चौक, शिरवणे गाव परिसरातील रहिवाशांचे हाल झाले.

१ हजाराहून व्हीआयपी 
कार्यक्रमासाठी देश-विदेशातून संगीतप्रेमींसह नेते, कलावंत, महत्त्वाच्या व्यक्ती असे एक हजाराहून अधिक व्हीआयपी आले होते. त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन स्टेडियम प्रवेशद्वारासमोरील सर्व्हिस रोड राखीव ठेवला होता. तेथे वाहनांना प्रवेश नव्हता.

अ‌वजड वाहनांच्या रांगाच रांगा
ए. आर. रेहमान यांच्या संगीत कार्यक्रमासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी शनिवारी बंदी घातली. यामुळे जेएनपीए व उरण परिसरात सुमारे दोन हजार अवजड वाहने ठिकठिकाणी अडकून पडली होती. 
परिणामी परिसरातील विविध रस्त्यांवर सुमारे  ३-४ किमी अंतरापर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली. 
शासनाच्या आदेशानुसार अवजड वाहतूक बंद केल्याची माहिती जेएनपीए वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. एम. मुजुमदार यांनी दिली.
जेएनपीए बंदरातून देशभरात जाणारी आणि देशभरातून माल घेऊन येणारी अवजड वाहतूक ठप्प झाली. यामुळे मात्र वाहतूकदारांचे दिवसभराचे आर्थिक नुकसान झाले आहे, असे न्हावा शेवा बंदर कंटेनर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी सांगितले.

कार्यक्रम सुरू होताना एकाच वेळी वाहनांची ये-जा वाढल्याने थोडी वाहतूक धिमी झाली होती. वाहतुकीच्या योग्य नियोजनामुळे कोंडी झाली नाही.  सायन-पनवेल मार्गाची वाहतूक थांबली नाही. 
सतीश जाधव, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुर्भे वाहतूक

Web Title: Nerulkar's faced traffic jam due to a r Rahman's live concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.