युलू युलू क्या है, हे युलू युलू; नवी मुंबईकरांनी केला साडेअकरा लाख किमी प्रवास
By नारायण जाधव | Updated: February 28, 2024 17:26 IST2024-02-28T17:23:58+5:302024-02-28T17:26:19+5:30
हवा प्रदूषणावर तोडगा म्हणून नवी मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक सायकल आणि ई-बाईक सुरू केल्या आहेत.

युलू युलू क्या है, हे युलू युलू; नवी मुंबईकरांनी केला साडेअकरा लाख किमी प्रवास
नारायण जाधव, नवी मुंबई : शहरातील वाहनांद्वारे होणाऱ्या हवा प्रदूषणावर तोडगा म्हणून नवी मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक सायकल आणि ई-बाईक सुरू केल्या आहेत. जन सायकल सहभाग प्रणालीद्वारे सायकल व ई-बाईक उभ्या करण्याकरिता युलू बाईक लिमिटेड यांना नवी मुंबई महापालिकेने बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे / सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली नोडमध्ये ९२ ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेल्या असून या प्रणालीस नागरिकांचा वाढता प्रतिसाद आहे.
मार्च २०२३ पासून जानेवारी २०२४ पर्यंत या प्रणालीचा १ लाख १८ हजार २३४ नागरिकांनी लाभ घेतला असल्याची माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. वर्षभरात नवी मुंबईकरांनी तीन लाख ८४ हजार फेऱ्यांद्वारे ११ लाख ५२ हजार २३० किमी अंतरासाठी युलू सायकल आणि बाईकचा वापर केला आहे. या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेस ११ कोटीहून अधिक कार्बन क्रेडिट प्राप्त झालेले आहे.
अशाप्रकारे जन सायकल सहभाग प्रणालीद्वारे ११ कोटीहून अधिक कार्बन क्रेडिट प्राप्त करणारी नवी मुंबई ही मुंबई महानगर प्रदेशातील एकमेव क वर्गीय महापालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. भविष्यात तिचा वापर आणखी कसा वाढेल, यासाठी आता महापालिका प्रशासन आणखी प्रयत्न करणार आहे.