अर्धवट कामांमुळेच नवी मुंबई तुंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:26 IST2019-07-11T23:25:13+5:302019-07-11T23:26:10+5:30
लोकप्रतिनिधींची स्थायी समितीमध्ये नाराजी ; सार्वजनिक बांधकाम विभागालाही नोटीस

अर्धवट कामांमुळेच नवी मुंबई तुंबली
नवी मुंबई : नियोजनबद्ध शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नवी मुंबईमध्ये पाणी शिरणे भूषणावह नाही. अर्धवट राहिलेल्या नालेसफाईमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी नगरसेवकांनी केली आहे. पालिकेनेही सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस पाठविली आहे. दिघा येथील धरणाची काळजी घेण्याचे पत्र रेल्वे प्रशासनाला दिले आहे.
मुसळधार पावसामुळे गत आठवड्यात नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये तब्बल ३२ ठिकाणी पाणी साचले. सायन-पनवेल महामार्गावर उरणफाटा व तुर्भेमध्ये दोन फूट पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. बोनसरीमध्ये १५ घरांमध्ये पाणी शिरले, दगडखाण परिसरातील जवळपास पाच झोपड्या वाहून गेल्या. एपीएमसीसह अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. याचे पडसाद गुरुवारी स्थायी समितीमध्ये उमटले. राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी या मुद्द्यावर सभागृहाचे लक्ष वेधले. नालेसफाईचे काम व्यवस्थित झाले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ३२ पेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचल्यामुळे आतापर्यंत नालेसफाईवर केलेला खर्च व्यर्थ गेला असल्याचे मत व्यक्त केले. सर्वच नगरसेवकांनी पाणी तुंबल्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरातील होल्डिंग पॉण्डची साफसफाई केली जात नाही. यामुळे भरतीचे पाणी थेट शहरात येऊ लागले आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. होल्डिंग पॉण्डमधील गाळ लवकरात लवकर काढण्यात यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. दिघामधील रेल्वे धरणाची स्थिती बिकट झाली आहे. त्याला गळती लागली असून ते फुटल्यास जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाल्याचेही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले.
नवी मुंबईमध्ये सायन-पनवेल महामार्गाचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. महामार्गाला लागून पावसाचे पाणी जाण्यासाठी गटार बांधण्यात आलेले नाहीत. सीबीडीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम केले असल्यामुळे सीबीडी व उरण फाटा परिसरामध्ये पाणी साचले. यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. शहरातील नालेसफाई व्यवस्थित झाली नाही. नाल्यामधील गाळ व्यवस्थित काढला नसल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचेही या वेळी नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे यांनीही सीबीडीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीमुळेच पाणी साचल्याचे सांगितले. सभापती नवीन गवते यांनीही आपत्कालीन यंत्रणा सक्षम करण्यात यावी, असे आदेश प्रशासनास दिले.
आपत्कालीन पुस्तिका छापण्यास विलंब
नवी मुंबई महानगरपालिका पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपत्कालीन आराखडा तयार करते. आपत्ती व्यवस्थापन आराखड्याच्या दोन पुस्तिका तयार केल्या जातात. एक पुस्तिकेमध्ये शहरातील आपत्ती होण्याची संभाव्य ठिकाणे व त्यांची माहिती दिली जाते. दुसऱ्या पुस्तिकेमध्ये सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये व मदत करणाºया संस्थांची माहिती व संपर्क क्रमांक दिले जातात. या पुस्तिकेमुळे कोणत्या आपत्तीमध्ये कोणाशी संपर्क केला पाहिजे याची माहिती होत असते. यावर्षी शहर जलमय झाल्यानंतरही अद्याप या पुस्तिका छापण्यात आलेल्या नाहीत.
पावसाळापूर्व नालेसफाई व इतर कामे करण्यात प्रशासन अपयशी ठरले असून, यामुळे नवी मुंबईची प्रतिमा मलीन होत आहे. प्रशासनाने सदस्यांच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. दिघा धरणही फुटून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने योग्य खबरदारी घेण्यात यावी.
- नवीन गवते, सभापती,
स्थायी समिती
सदस्यांनी केलेल्या सूचनांची माहिती आयुक्तांना दिली जाईल. आवश्यक त्या ठिकाणी कामे सुरू केली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनालाही नोटीस पाठविण्यात आली असून योग्य उपाययोजना करण्यास सुचविले आहे.
- महावीर पेंढारी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीमुळे सीबीडीमध्ये पाणी साचले आहे. महापालिकेचेही नालेसफाईच्या कामावर लक्ष नसून होल्डिंग पॉण्डची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
- डॉ. जयाजी नाथ,
नगरसेवक,
प्रभाग-१०४
जुईनगर परिसरामध्येही पाणी साचले होते. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता फोन उचलला जात नव्हता. नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्यामुळे पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नाही.
- रंगनाथ औटी, नगरसेवक,
प्रभाग-८४
होल्डिंग पॉण्डची साफसफाई होणे आवश्यक आहे. प्रशासनाने यासाठी योग्य कार्यवाही करावी. नाल्यांमधील ५० टक्के गाळही काढला नसल्यामुळे शहरात पाणी साचत असून प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी.
- दिव्या गायकवाड,
प्रभाग-६४
शहरात ३२ पेक्षा जास्त ठिकाणी पाणी तुंबले हे भूषणावह नाही. नालेसफाईवर केलेला खर्च व्यर्थ झाला आहे. पुन्हा अशी स्थिती उद्भवणार नाही यासाठी काळजी घेण्यात यावी.
- रवींद्र इथापे,
नगरसेवक,
प्रभाग-१००