मुंबईतील घटना ताजी असताना नवी मुंबईतील एका खाजगी शाळेतील महिला शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अनुचित वर्तन केल्याची घटना उघडकीस आली. पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबंधित शिक्षिकेवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकेने रविवारी संध्याकाळपासून सोमवार सकाळपर्यंत पीडित विद्यार्थ्याशी इंस्टाग्रामवर चॅट केली. विद्यार्थ्याशी चॅट करताना शिक्षिका अयोग्य कपड्यात दिसली, ज्याचा मुलांच्या मानसिक विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी तक्रार पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत केली. त्यानुसार, पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ११ आणि १२ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.