Navi Mumbai Municipal Corporation elections postponed again? | नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? 

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? 

- कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई :  राज्य निवडणूक आयोगाने नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे याबाबतची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकासुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  परिणामी, मागील तीन  महिन्यांपासून कामाला लागलेल्या प्रमुख राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे.


नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने महापालिकेने तयारी केली होती. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १११ प्रभागांची आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. परंतु आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोरोनाचा शिरकाव झाल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने येत्या एप्रिल महिन्यात निवडणुका होतील, असे कयास बांधले गेले. त्यानुसार प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात कार्यक्रमांचा धडाका सुरू केला. संपर्क कार्यालयांचे पेव फुटले. न केलेल्या विकासकामांच्या उद्घाटनांचे बार उडविण्यात आले. हळदी-कुंकू व क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याची शर्यत सुरू झाली. त्यासाठी अनेकांनी लाखो रुपयांची उधळण केली. 
काही नाराजांनी  पक्षांतराचा मार्ग अवलंबिला. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या १४ माजी नगरसेवकांना गळाला लावले. गल्लीबोळात रंगलेल्या सभा, समारंभाच्या फडातून इंटरनॅशनल डॉनच्या ओळखीचा हवाला देण्यात आला. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. निवडणूक पूर्व आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि इच्छुकांची पुन्हा निराशा झाली. 


राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार महापालिकेने निवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारी रोजी महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती.  
१६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत महापालिकेला ३,४९७ सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या आहेत. जाहीर झालेल्या मतदार यादी कार्यक्रमानुसार सूचना व हरकतींचा निपटारा करून ३ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे गरजेचे होते. 
परंतु सध्या फैलावर असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूभीवर पारदर्शक कामाची खात्री न वाटल्याने निवडणूक आयोगाने अंतिम यादी प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध करण्याची नवीन तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे निवडणूक आणखी काही काळ पुढे ढकलली जाण्याचा निष्कर्ष लावला जात आहे.

आर्थिक कोंडी झाल्याने 
सर्व पक्षांतील इच्छुक धास्तावले  
निवडणूक पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. कारण यापूर्वी एप्रिल २०२० मधील नियोजित निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक उधळण केली होती. परंतु, कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलल्याने हा सर्व खर्च वाया गेला. त्यानंतर कोरोनाच्या टाळेबंदीत अनेकांची आर्थिक कोंडी झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा निवडणुकीचे वेध लागले. त्यामुळे  इच्छुक उमेदवार पुन्हा रिंगणात उतरले. त्यानुसार मागील तीन-चार महिन्यांत वारेमाप खर्च करण्यात आला. परंतु आता पुन्हा निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्व पक्षांतील इच्छुक उमेदवार धास्तावले आहेत.

Web Title: Navi Mumbai Municipal Corporation elections postponed again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.