सलग तिसऱ्या दिवशीही अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई; तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग

By योगेश पिंगळे | Published: May 18, 2024 03:37 PM2024-05-18T15:37:25+5:302024-05-18T15:38:29+5:30

१७ ते १८ मे रोजी पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सायन पनवेल रोड नजीक वाशी गाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डिंग हटविण्याची कारवाई २ दिवस अहोरात्र काम करून केली असून त्याठिकाणची ४ होर्डिंग निष्कासित केली आहेत

Navi Mumbai Municipal Corporation action on unauthorized hoardings for the third day in a row | सलग तिसऱ्या दिवशीही अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई; तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग

सलग तिसऱ्या दिवशीही अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई; तीन दिवसांत उतरवले ३१ होर्डिंग

नवी मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथे वादळी वारे आणि अकाली पर्जन्यवृष्टी कालावधीत होर्डिंग पडून घडलेल्या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी परवाना तसेच अतिक्रमण विभागाला सतर्क राहून कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार या विभागाने शहरात सलग तीन दिवस कारवाई करून ३१ मोठे होर्डिंग हटविले आहेत. यामध्ये वाशी गावाजवळील अवाढव्य होर्डिंगचा ही समावेश आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग अधिकारी यांच्या समूहाने कारवाई करीत पहिल्या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील १५ मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डिंग काढले. दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अथक कारवाई करून ६ मोठे होर्डिंग हटविले. ही मोहीम तिसऱ्या दिवशीही तितक्याच तीव्रतेने चालू ठेवून १८ मे रोजी पहाटेपर्यंत १० मोठे होर्डिंग सुरक्षितपणे निष्कासित करून तीन दिवसांत ३१ अनधिकृत होर्डिंग हटविले आहेत.

१७ ते १८ मे रोजी पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सायन पनवेल रोड नजीक वाशी गाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डिंग हटविण्याची कारवाई २ दिवस अहोरात्र काम करून केली असून त्याठिकाणची ४ होर्डिंग निष्कासित केली आहेत. नेरूळ विभागातही हर्डिलिआ कंपनी नजीक सायन-पनवेल रोड शेजारी लक्ष्मीवाडी याठिकाणी असलेले ३ मोठे अनधिकृत होर्डिंग निष्कासित केले आहेत. ऐरोली विभागात ऐरोली- पटनी रोड येथील पदपथावर असणारे सेक्टर २० येथील होर्डिंग तसेच ऐरोली सेक्टर ९ दिवागाव येथे वंदना अपार्टमेंट येथील होर्डिंग अशी २ मोठी अनधिकृत होर्डिंग हटविली आहेत.

त्याचप्रमाणे घणसोली कार्यक्षेत्रातील रबाले रेल्वेस्टेशन समोर मोनार्क हॉटेल नजिक असलेले अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली आहे. होर्डिंग काढताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली असून हायवे लगतची मोठी होर्डिंग काढताना रहदारीला व वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये याचीही काळजी घेऊन अशा ठिकाणची होर्डिंग मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत काढली आहेत. अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई अशीच कार्यान्वित राहणार असून प्रसंगी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. गेठे यांनी सांगितले.

Web Title: Navi Mumbai Municipal Corporation action on unauthorized hoardings for the third day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.