Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 09:16 IST2025-06-21T09:12:59+5:302025-06-21T09:16:52+5:30
Navi Mumbai Murder: तुर्भे येथील तरुणाच्या हत्या प्रकरणात मस्करी जिवावर बेतल्याचे तपासात समोर आले.

Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : तुर्भे येथील तरुणाच्या हत्या प्रकरणात मस्करी जिवावर बेतल्याचे तपासात समोर आले आहे. मुलीवरून सतत चिडवत असल्याने मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे उघडकीस आले. ही घटना बुधवारी घडली होती. संजय बेहरा (वय २२, रा. आजवानी कॉरी, महापे) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश होनहागा (वय २०) याला अटक केली आहे. चौकशीत संजयकडून होणाऱ्या बदनामीमुळे त्याची हत्या केल्याची कबुली सुरेशने दिली.
संजय हा सुरेशला मुलीवरून चिडवत होता. बदनामी होत असल्याने त्याने थट्टा थांबवण्याची समज त्याला दिली. त्यानंतरही संजयने मस्करी सुरूच ठेवल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. तरीही तो बदनामी करत असल्याची माहिती सुरेशला मिळाली. यामुळे त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने तो संजयला खेकडे पकडायच्या बहाण्याने घनदाट झाडीत घेऊन गेला. तेथे दोघेही दारू प्यायले. नशेत असल्याची संधी साधून सुरेशने संजयच्या गळ्यावर कटरने वार केले. हा प्रकार परिसरातील १३ वर्षाच्या मुलासमक्ष घडला होता. या कृत्याचा त्याला पश्चात्ताप झाला. बुधवारी तुर्भे पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने हत्येची कबुली दिली.