Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 06:48 IST2025-11-16T06:46:19+5:302025-11-16T06:48:52+5:30
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले उड्डाण २५ डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी होणार आहे.

Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले उड्डाण २५ डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी होणार आहे. महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. आता ट्रॅव्हल्स एजन्सीकडे तिकीट बुकिंगसाठी विचारणा करण्यात येत आहे.
फ्लाइट्सचे वेळापत्रकही प्रवाशांसाठी खूप सोयीस्कर असे ठेवले आहे. काही विमानांची उड्डाणे दररोज, तर काही फ्लाइट्स विशिष्ट दिवशीच असतील. सकाळपासून ते रात्रीपर्यंत विविध वेळांवर दिल्ली, गोवा आणि कोचीसाठी फ्लाइट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना सोयीप्रमाणे फ्लाइटची निवड करता येणार आहे.
गोव्याच्या बुकिंगसाठी तब्बल १२ हजारांचे तिकीट दिसत होते. त्यानंतर ६ हजार ५०० ते ७ हजार ८०० असे एकेरी प्रवासासाठी दाखवत होते. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या प्रवासासाठी अनेक जण उत्साही आहेत. हमीद अन्सारी, ट्रॅव्हल एजंट
नामकरणाचे काय?
विमानतळाला शेतकऱ्यांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी स्थानिकांची आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे ठराव पाठवून चार वर्षांचा कार्यकाळ लोटला आहे. उद्घाटनाप्रसंगी तरी दिबांच्या नावाबाबत घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, तसेही झाले नाही. त्यामुळे दिबांच्या नामकरणाचा मुद्दा मागे पडला असून, लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का बसलेत, असा सवाल शेतकरी, प्रकल्पग्रस्त करत आहेत.
थेट हवाई सेवा कुठे?
- ‘अकासा एअर’च्या अधिकृत वेबसाइटनुसार २५ डिसेंबरपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांच्या प्रवासी उड्डाणांना सुरुवात होणार आहे. नवी मुंबई विमानतळावरून ‘अकासा एअर’ दिल्ली तसेच गोवा, कोची आणि अहमदाबाद या चार शहरांसाठी थेट सेवा देणार आहे.
- अनेकांनी अकासा एयरलाइन्सवर २५ डिसेंबरसाठी शनिवारी तिकीट बुकिंगचा प्रयत्न केला असता सुरुवातीच्या काळात तब्बल १२ हजार रुपये गोव्याचे दर दाखवत होते. त्यानंतर सहा हजार ३०० रुपयांचे दर दाखविण्यात आले. तर, इंडिगोच्या वेबसाइटवर हे दर सात हजार ८०० रुपये आहेत.
- काही कंपन्यांनी तिकीट दर मोठ्या प्रमाणावर वाढविल्याचे दिसत आहे. ख्रिसमस आणि नववर्षात अनेक जण गोव्यामध्ये सुटी साजरी करण्यासाठी जातात. त्यादरम्यान विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू होणार असल्याने पनवेल, नवी मुंबईतील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. इंडिगो ही कंपनीही येथून विमानसेवा सुरू करणार आहे.