२९ मार्चपासून नवी मुंबई विमानतळावर सेवांचा विस्तार; ‘या’ ६ शहरांसाठी विमाने सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:21 IST2026-02-26T19:18:20+5:302026-02-26T19:21:39+5:30
Navi Mumbai Airport Airline Services Expansion: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातील सहा शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.

२९ मार्चपासून नवी मुंबई विमानतळावर सेवांचा विस्तार; ‘या’ ६ शहरांसाठी विमाने सुरू होणार
Navi Mumbai Airport Airline Services Expansion: २५ डिसेंबर २०२५ हा दिवस नवी मुंबईच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले होताच पहिल्याच दिवशी विमानतळावर उत्साह, कुतूहल दिसले. पहिल्या उड्डाणाचा साक्षीदार होण्याचा अभिमान अनेकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. यानंतर आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान सेवांचा विस्तार केला जात आहे. देशभरातील सहा शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या देशव्यापी डिजीयात्रा उपक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने डिजिटल पद्धतीने अधिकृत सहभाग नोंदवला असून, अत्याधुनिक, तंत्रज्ञानाधारित प्रवास प्रक्रियेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशातील आणखी पाच विमानतळांवर हा उपक्रम एकाच वेळी सुरू करण्यात आला. या प्रणालीमुळे विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ होते. यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातील सहा शहरांमध्ये इंडिगो नव्याने विमानसेवा सुरू करणार आहे.
२९ मार्चपासून नवी मुंबई विमानतळावर सेवांचा विस्तार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या २९ मार्चपासून ही सुविधा सुरू होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर अशा प्रमुख सहा शहरांसाठी नवी मुंबई विमानतळावरून विमाने उड्डाण करणार आहेत. या विमानांचे बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही. तिकिटे इंडिगो संकेतस्थळावर, मोबाईल ॲपवर आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्सच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, नवी मुंबईहून उड्डाणे वाढवणे हे इंडिगोच्या एटीआर नेटवर्कचा विस्तार करून पर्यटनाला चालना देण्याच्या, प्रादेशिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या आणि लहान शहरांपासून मोठ्या शहरांमध्ये जलद प्रवास सुलभ करण्यावर भर दिला आहे. इंडिगोने फेब्रुवारी २०२६ च्या सुरुवातीला वाइड- बॉडी विमानांच्या ऑपरेशनवरील काही अडचणींमुळे लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये तात्पुरते बदल जाहीर केले आहेत.