नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरला, तर विमानोड्डाण डिसेंबरमध्ये; विजय सिंघल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 07:17 IST2025-08-21T07:16:15+5:302025-08-21T07:17:11+5:30

विमानतळाच्या कामाला गती

Navi Mumbai airport to be inaugurated in October, flights to start in December; Vijay Singhal's information | नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरला, तर विमानोड्डाण डिसेंबरमध्ये; विजय सिंघल यांची माहिती

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरला, तर विमानोड्डाण डिसेंबरमध्ये; विजय सिंघल यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये करून डिसेंबरमध्ये विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी दिली. विमानतळाचा सप्टेंबरमध्ये शुभारंभ करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार कामाला गती दिली आहे. असे असले तरी काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणे बाकी आहे. संबंधित प्रक्रिया पुढील महिन्याभरात पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले.

विमानतळावर प्रवासी किंवा मालवाहतूक उड्डाणे सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची परवानगी अत्यावश्यक असते. एरोड्रोम परवाना हा धावपट्टीची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना, पायाभूत सुविधा, एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम, अग्निशमन व्यवस्था, सुरक्षा कर्मचारी, कस्टम्स व इमिग्रेशन तसेच पर्यावरणीय मानकांसाठी अधिकृत प्रमाणपत्र असते. पुढील काही दिवसांत हे प्रमाणपत्र प्राप्त होईल. त्यानंतर  ‘ऑपरेशनल रेडिनेस ॲण्ड एअरपोर्ट ट्रायल्स’ (ओआरएटी) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्यांचा  कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये होईल. त्यानंतर साधारण डिसेंबरच्या मध्यावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल, असा विश्वास  सिंघल यांनी व्यक्त केला.

दोन पक्षीतस्कर उलव्यात जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : येथील उलवा नोड परिसरात वनविभागाने वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत ४२ संरक्षित मुनिया प्रजातींचे पक्षी जप्त केले आहेत. या कारवाईत दोन तस्करांना अटक केली असून, त्यांना पनवेल न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कारवाईदरम्यान रेड मुनिया, स्केली - ब्रेस्टेड मुनिया आणि ट्रायकलर्ड मुनिया या संरक्षित पक्ष्यांच्या प्रजाती विक्रीस ठेवलेल्या असल्याचे समोर आले आहे. यामुळे पक्षी तस्करीच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. अटक केलेल्या दोघांमध्ये देवेंद्र लालचंद पाटील आणि दुसरा हरेश दामोदर पाटील यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. ही यशस्वी कारवाई डीसीएफ राहुल पाटील, एसीएफ माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ कोकरे, वनपाल पाटील, वनपाल माने, वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य यांच्या मदतीने केली.

Web Title: Navi Mumbai airport to be inaugurated in October, flights to start in December; Vijay Singhal's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.