नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईची ‘मल्टी-एअरपोर्ट सिस्टीम’कडे भरारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 08:15 IST2025-12-25T08:15:19+5:302025-12-25T08:15:37+5:30
आजपासून व्यावसायिक उड्डाणे; मुंबईच्या हवाई वाहतुकीवरील ताण कमी

नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईची ‘मल्टी-एअरपोर्ट सिस्टीम’कडे भरारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवार, २५ डिसेंबरपासून व्यावसायिक विमानसेवांसाठी खुले होत आहे. यामुळे मुंबईच्या हवाई वाहतुकीवरील ताण कमी करण्यासोबतच शहराला ‘मल्टी-एअरपोर्ट सिस्टीम’कडे नेणारा असल्याचे अदानी समूहाने बुधवारी स्पष्ट केले.
गेल्या दशकभरापासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाढलेली प्रवासी व विमानांची गर्दी ही मोठी समस्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील हे नवे हवाई प्रवेशद्वार मुंबई, नवी मुंबई, पनवेलसह संपूर्ण ‘एमएमआर’ परिसरासाठी दिलासादायक ठरणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.
२०२१ पासून अदानी समूहाच्या माध्यमातून अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेडने या प्रकल्पाचा विकास, बांधकाम आणि ऑपरेशनल तयारी वेगाने पूर्ण केली आहे. या प्रकल्पामुळे महामुंबईचा विकास झपाट्याने होईल, अशी अपेक्षा आहे.
येत्या फेब्रुवारीपासून २४ तास सेवेला प्रारंभ
पहिल्याच दिवशी इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, अकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांच्या देशांतर्गत सेवा सुरू होतील. एकूण ९ शहरांशी संपर्क साधणाऱ्या १५ नियोजित उड्डाणांची हाताळणी पहिल्या दिवशी होणार आहे. प्रारंभी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विमानतळ कार्यरत राहणार असून, दररोज २४ उड्डाणे आणि ताशी १० विमान हालचालींची क्षमता असेल. फेब्रुवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने २४ तास सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.
आर्थिक विकासाला बळ
प्रारंभी २० दशलक्ष प्रवाशांची वार्षिक क्षमता असलेल्या या विमानतळाची भविष्यात ९० दशलक्ष प्रवाशांपर्यंत विस्तारण्याची योजना आहे. तसेच कार्गो टर्मिनल आणि बहुविध वाहतूक जोडणीमुळे हा विमानतळ मुंबईच्या आर्थिक विकासाला नवे बळ देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
समारंभाविनाच विमानांचे उड्डाण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सिडकोचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे समाधान आहे. गुरुवारपासून हे विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले होत आहे. मात्र, सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोणत्याही समारंभाशिवाय त्याचा व्यावसायिक वापर सुरू करणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी स्पष्ट केले.
पहिल्या दिवशी इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांची विमाने उड्डाण घेणार आहेत. येथे सकाळी ८ वाजता ६ई ४६० (बंगळुरू) या विमानाचे आगमन होईल. त्यानंतर ६ई ८८२ (हैदराबाद) हे विमान सकाळी ८:४० वाजता उड्डाण घेईल. १५ जानेवारीपर्यंत दिवसाला सुमारे ४८ विमानांचे लॅण्डिंग आणि टेकऑफ हाेईल, असे सिंघल यांनी सांगितले.