अटल सेतुमुळे तिसऱ्या मुंबईसह नैना, रायगड-पुणे-गोवा येणार अधिक नजीक, रिअल इस्टेटला सुगीचे दिवस
By नारायण जाधव | Updated: January 13, 2024 19:07 IST2024-01-13T19:06:36+5:302024-01-13T19:07:15+5:30
अलिबाग परिसराचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे.

अटल सेतुमुळे तिसऱ्या मुंबईसह नैना, रायगड-पुणे-गोवा येणार अधिक नजीक, रिअल इस्टेटला सुगीचे दिवस
नवी मुंबई: न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतूमुळे केवळ मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरेच जवळ येणार नसून सिडको आणि एममएआरडीएने प्रस्तावित केलेल्या तिसऱ्या नवी मुंबईसह सिडकोचे नैना क्षेत्र आणि पुणे, रायगड जिल्ह्यासह कोकण आणि गोवा मुंबईच्या अधिक जवळ येणार आहे. हा सागरी सेतू प्रस्तावित विरार-अलिबाग कॉरिडॉर, कोकण ग्रीनफील्ड हायवेसह विद्यमान मुंबई-गोवा, मुंबई- पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास चिर्ले येथूनच जोडला आहे. याशिवाय कोकण ग्रीनफील्ड हायवेचाच एक भाग असलेला रेवस ते करंजा या धरमतर खाडीवरील सागरी सेतूची निविदा प्रक्रिया रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच सुरू आहे. ते करंजा या धरमतर खाडीवरील सागरी सेतूमुळे अलिबाग ते मुंबईचे अंतर अवघ्या ४० मिनिटांवर येणार आहे. यामुळे अलिबाग परिसराचा विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे.
तिसरी मुंबई, ग्रोथ सेंटरला होणार लाभ
न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतूच्या परिघात सिडकोने पूर्वी खोपटा नवनगर शहर प्रस्तावित केले होते. मात्र, या खोपटा नवनगरसह एमएमआरडीएने नैना क्षेत्रातील काही गावे मिळून तिसरी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतला आहे, तर एमएमआरडीएने पेणनजीक ऑरेंज सिटी नावाचे ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. याशिवाय पनेवल-पेण-अलिबाग-कर्जत पट्ट्यात अनेक खासगी विकासकांच्या टाऊनशिप आकार घेत आहेत.
मुंबई, नवी मुंबईच्या तुलनेत या भागात घरे स्वस्त असल्याने या सागरी सेतूमुळे तेथील रहिवासी, उद्योजकांची मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिक जवळ येणार आहे. श्रीवर्धन-म्हसळा-रोहा परिसरातील प्रस्तावित औद्योगिकनगरीस त्याचा लाभ होणार आहे. कोकण-गोवा दोन तासाने अंतर कमी होणार आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉर, कोकण ग्रीनफील्ड हायवेसह विद्यमान मुंबई-गोवा, मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास चिर्ले येथूनच जोडला जाणार आहे. सध्या चिर्ले जंक्शनचे काम जोमात सुरू आहे. यामुळे नैना, रायगड-पुणे-गोवाचे मुंबईमधील अंतर किमान दोन तासांनी कमी होऊन हा पट्टाही मुंबईच्या अधिक नजीक येणार आहे.