"एन. डी. पाटील हे विचारांची निष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:00 IST2020-03-01T00:00:18+5:302020-03-01T00:00:30+5:30
शेतकरी, शेतमजूर, कामगार आदिवासी पाड्यातील सर्वसामान्य माणसाचे जीवन उंचावण्यासाठी त्यांचे अविरत कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढले.

"एन. डी. पाटील हे विचारांची निष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व"
पनवेल : विचारांची निष्ठा जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून एन. डी. पाटील यांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी आणि समाजातील सर्वसामान्यांच्या जीवनाशी एकरूप झालेले पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान होत आहे, हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठी, सीमा भागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार आदिवासी पाड्यातील सर्वसामान्य माणसाचे जीवन उंचावण्यासाठी त्यांचे अविरत कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उत्पादन शुल्क व कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काढले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा खांदा वसाहतीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाला दिलीप वळसे-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ते म्हणाले, महाराष्ट्रामधील थोर समाज सुधारकांमध्ये ज्यांचे नाव अग्रगण्याने घेतले जाते, त्यापैकी एन. डी. पाटील एक आहेत. पाटील यांचे जीवन म्हणजे अखंड संघर्ष असून, हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे चळवळीचे शास्त्र आणि शस्त्र स्वत:च्या कृतीतून विकसित करणारे लोकनायक एन. डी. पाटील यांना जीवन गौरव प्रदान करताना आनंद होत असून संघर्षाच्या लोकनायकाचा गौरव स्फूर्ती देणारा असल्याचे विचार वळसे-पाटील यांनी या वेळी मांडले.
व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री आशिष शेलार, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोजिनी पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भगीरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, उपमहापौर जगदीश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात आदिती तटकरे, आशिष शेलार, श्रीरंग बारणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत, एन. डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत जनार्दन भगत यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, बबन पाटील, संजीव पाटील, मीना जगधने, दशरथ भगत, अरुण भगत, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक शकुंतला ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संजय भगत, हरिश्चंद्र पाटील, अनिल भगत, संजय पाटील, अतुल पाटील, नगरसेवक सतीश पाटील उपस्थित होते.
>आयुष्यात रुळलेल्या वाटेवरून न चालता, नवीन वाट निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. मळलेल्या वाटेने कुणीही जातो; पण जो स्वत:चा मार्ग तयार करतो, तोच जीवनात यशस्वी होतो, असे मनोगत एन. डी. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले. जनार्दन भगत यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचेही त्यांनी या वेळी कौतुक केले.