मुस्लिम मोर्चात मराठा अन मराठा मोर्चात मुस्लिम समाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 03:12 IST2016-10-06T03:12:30+5:302016-10-06T03:12:30+5:30
राज्यात मराठा समाज शांतपणे आणि शिस्तबद्धपणे मोर्चे काढून मागण्या मांडत आहेत. ते कोणत्याही समाजाला लक्ष करीत नाहीत

मुस्लिम मोर्चात मराठा अन मराठा मोर्चात मुस्लिम समाज
ठाणे : राज्यात मराठा समाज शांतपणे आणि शिस्तबद्धपणे मोर्चे काढून मागण्या मांडत आहेत. ते कोणत्याही समाजाला लक्ष करीत नाहीत. ओबीसींच्या वाट्यातील आरक्षण व अॅट्रासिटी रद्द करण्याची ते मागणीही करीत नाहीत. तर, त्याचा त्रास होऊ नये, अशी माफक अपेक्षा धरत आहेत. त्यामुळे एक -दोघांच्या बोलण्याने अॅट्रासिटी रद्द होणार नाही. महाराष्ट्रातील मराठा मोर्चामध्ये मुस्लीम आणि मराठ्यांमधील स्नेह वृद्धींगत होताना दिसत आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत जमेची बाजू असून महादेव जानकर यांच्यासारखे नेते दिशाभूल करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी मुंब्रा येथे मोर्चा आयोजिला आहे. या मोर्चात मराठा, ओबीसी आणि क्षत्रीय समाज सहभागी होणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्रीयन मुस्लीम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मराठा खान, मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फिरोज मासुलदार, महाराष्ट्र पुरोगामी समाज संघटनेचे आसद चाऊस, मराठा क्र ांती मोर्चाचे संयोजक रमेश आंब्रे, क्षत्रीय समाजाचे एन.एम. सिंह, किमान वेतन आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली अश्रफ, शमीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.
७ आॅक्टोबरला मुंब्रा येथील दारु ल फलाह मशीद ते मुंब्रा रेल्वे स्टेशन असा हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये ओबीसी, मराठा समाजाचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. तर, १६ आॅक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चेत मुस्लीम समाजाचे लोकही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुस्लीम आणि मराठा समाज स्वतंत्र आणि वेगवेगळे आरक्षण मागत आहे. मात्र, महादेव जानकर यांच्यासारखे नेते चुकीची विधाने करु न तेढ निर्माण करीत आहेत. मराठा मोर्चामुळे दलित-ओबीसी घाबरले आहेत, असे विधान त्यांनी केले आहे. मात्र, हा त्यांचा वैयिक्तक आभास आहे. मराठा मोर्चा कोणाला घाबरवण्यासाठी काढलेले नाहीत. मराठा मोर्चामुळे दलित आणि ओबीसींमध्ये घाबरण्यासारखी परिस्थितीही नाही. या समाजांमध्ये आरक्षणासारख्या मुद्यावर तेढ नाही.