पालिकेमध्ये १५ घराण्यांचे वर्चस्व, चार कुटुंबांत प्रत्येकी तीन नगरसेवक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:03 IST2020-03-01T00:03:27+5:302020-03-01T00:03:52+5:30
सद्यस्थितीमध्ये चार कुटुंबांमध्ये प्रत्येकी तीन व दहा घरांमध्ये दोन नगरसेवक असून, सर्वच राजकीय पक्षांनी घराणेशाहीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली असल्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची उपेक्षा होऊ लागली आहे.

पालिकेमध्ये १५ घराण्यांचे वर्चस्व, चार कुटुंबांत प्रत्येकी तीन नगरसेवक
नामदेव मोरे
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या तीन दशकांच्या वाटचालीमध्ये प्रत्येक विभागामध्ये राजकीय घराणी तयार झाली आहेत. १५ घराण्यांचा पालिकेच्या राजकारणावर वरचष्मा राहिला आहे. सद्यस्थितीमध्ये चार कुटुंबांमध्ये प्रत्येकी तीन व दहा घरांमध्ये दोन नगरसेवक असून, सर्वच राजकीय पक्षांनी घराणेशाहीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली असल्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची उपेक्षा होऊ लागली आहे.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची उभारणी केल्यानंतर १९९२ मध्ये शासनाने महानगरपालिकेची स्थापना केली. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेमध्ये रूपांतर झालेले हे एकमेव शहर. १९९५ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये महापालिकेची सत्ता विशिष्ट घराण्यांभोवती फिरत राहिली आहे. माजी मंत्री व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या परिवाराचे शहराच्या राजकारणावर वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी याच घरात मंत्री, दोन आमदार, खासदार व महापौर ही प्रमुख पदे होती, यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर घराणेशाहीची टीका करण्यास सुरुवात केली होती; पण अशाप्रकारची घराणेशाही सद्यस्थितीमध्ये प्रत्येक नोडमध्ये तयार झाली आहे. पालिकेमध्ये आतापर्यंत १५ घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे.
सद्यस्थितीमध्ये चार कुटुंबांमधील प्रत्येकी तीन नगरसेवक कार्यरत असून, दहा घरांमधील प्रत्येकी दोन नगरसेवक महापालिकेमध्ये कार्यरत आहेत. या वेळच्या निवडणुकीमध्येही काही ज्येष्ठ पदाधिकारी व नगरसेवकांनी स्वत:च्या घरामध्ये दोन ते चार तिकिटे मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
राजकीय घराणेशाहीमुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ लागला आहे. पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करायचे. पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचे व शेवटी तिकीट नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या घरामध्येच दिले जात आहे. यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वाट्याला उपेक्षाच येऊ लागली आहे. या निवडणुकीमध्येही जास्तीत जास्त तिकिटे स्वत:च्या नातेवाइकांना मिळावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
>तुर्भेमधील पाटील कुटुंबीय
नवी मुंबईच्या व महानगरपालिकेच्या राजकारणावर तुर्भेमधील डी. आर. पाटील कुटुंबीयांचेही वर्चस्व राहिले आहे. स्वत: डी. आर. पाटील स्थायी समितीचे सभापती होते. त्यांचे बंधू भोलानाथ पाटील उपमहापौर होते. दोन्ही नेत्यांच्या निधनानंतरही या परिवारातील सदस्य सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. आतापर्यंत बेबीताई पाटील, विवेक पाटील, चंद्रकांत पाटील नगरसेवक होते. सद्यस्थितीमध्ये शुभांगी पाटील व शशिकला पाटील नगरसेविका आहेत. शुभांगी पाटील यांनी स्थायी समितीचे सभापतिपदही भूषविले आहे.
>नाईक कुटुंब
नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईक परिवाराचे वर्चस्व आहे. सद्यस्थितीमध्ये नाईक परिवारातील वैशाली नाईक या एकमेव नगरसेविका आहेत; परंतु यापूर्वी संजीव नाईक व सागर नाईक यांनी महापौरपद व संदीप नाईक यांनी सलग तीन वर्षे स्थायी समिती सभापतिपद भूषविले आहे.
>नवी मुंबई महापालिकेतील राजकीय घराणी
>विजय चौगुले
शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांच्या कुटुंबीयांचेही महापालिकेच्या राजकारणामध्ये वर्चस्व आहे. स्वत: चौगुले, त्यांचा मुलगा ममित चौगुले नगरसेवक आहेत. त्यांचे नातेवाईक आकाश मढवी हेही नगरसेवक आहेत.
>एम. के. मढवी
ऐरोलीमधील नगरसेवक एम. के. मढवी हे स्वत: नगरसेवक आहेत. त्यांच्या पत्नी विनया मढवी व मुलगा करण मढवी हेही नगरसेवक आहेत. जवळपास दोन दशकांपासून मढवी यांचा ऐरोली परिसरामध्ये प्रभाव आहे. पूर्वी दोन प्रभागांमध्ये त्यांच्या परिवारातील सदस्य निवडून येत होते. मागील निवडणुकीमध्ये तीन सदस्य निवडून आले आहेत.
>नवीन गवते
स्थायी समिती सभापती नवीन गवते यांचा दिघा परिसरावर प्रभाव आहे. दहा वर्षांपूर्वी गवते कुटुंंबामधील एक सदस्य महापालिकेमध्ये होता. सद्य:स्थितीमध्ये त्यांच्या घरातील तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत.
>सुधाकर सोनावणे
माजी महापौर सुधाकर सोनावणे यांचेही रबाळेमधील एमआयडीसी परिसरामध्ये वर्चस्व आहे. ते २० वर्षांपासून निवडून येत आहेत. त्यांची पत्नीही नगरसेविका असून, यापूर्वी मुलगीही नगरसेविका होती.
>प्रशांत पाटील
घणसोलीमधील प्रशांत पाटील यांनीही या परिसरामध्ये दबदबा निर्माण केला आहे. ते स्वत:, आई व पत्नीही नगरसेविका आहेत. त्यांनी यापूर्वी शिक्षण मंडळ सदस्य म्हणूनही काम केले आहे.
>शिवराम पाटील
कोपरखैरणेमध्ये शिवराम पाटील हे २५ वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांनी स्थायी समिती सभापतिपदही भूषविले असून त्यांच्या पत्नीही नगरसेविका आहेत.
>दशरथ भगत
वाशी विभागामध्ये दशरथ भगत यांचा प्रभाव आहे. ते स्वत: यापूर्वी नगरसेवक व विरोधी पक्षनेतेही होते. सद्य:स्थितीमध्ये त्यांची पत्नी व परिवारातील इतर दोन, असे तीन नगरसेवक त्यांच्या घरातील आहेत.
>सुरेश कुलकर्णी
नवी मुंबई महापालिकेमध्ये नाईक परिवारातील संदीप नाईक वगळता फक्त सुरेश कुलकर्णी यांनाच तीन वेळा स्थायी समिती सभापती होता आले आहे. परिवहन सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे, त्यांच्या पत्नीही नगरसेविका आहेत.
>सोमनाथ वास्कर
सानपाडामधून सोमनाथ वास्कर व त्यांच्या पत्नी कोमल वास्कर निवडून आल्या आहेत. दोघेही प्रत्येकी दहा वर्षे महापालिकेमध्ये आहेत. वास्कर यांनी यापूर्वी शिक्षण मंडळ सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
>अशोक गावडे
रााष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष अशोक गावडे व त्यांची मुलगी स्वप्ना गावडे महापालिकेत नगरसेवक म्हणून आहेत. गावडे यांची पत्नीही यापूर्वी नगरसेविका होत्या. अशोक गावडे यांनी यापूर्वी उपमहापौरपदही भूषविले आहे.
>लक्ष्मीकांत पाटील
घणसोली परिसरामध्ये लक्ष्मीकांत पाटील यांनीही त्यांचा प्रभाव वाढविण्यास सुरुवात केला आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या घरातील एक सदस्य होते. आता दोन सदस्य महापालिकेमध्ये आहेत.