मृतदेह अदलाबदली प्रकरण अधिकाऱ्यांना भोवणार; आयुक्तांनी बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 07:24 PM2020-05-31T19:24:12+5:302020-05-31T19:24:30+5:30

चौकशी समितीच्या अहवालातून हलगर्जीपणा उघड

municipal commissioner issues notice to officers responsible for dead body exchange | मृतदेह अदलाबदली प्रकरण अधिकाऱ्यांना भोवणार; आयुक्तांनी बजावली नोटीस

मृतदेह अदलाबदली प्रकरण अधिकाऱ्यांना भोवणार; आयुक्तांनी बजावली नोटीस

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - रुग्णालयातून मृतदेहाची अदलाबदल होऊन मुस्लिम तरुणावर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार झाल्याचे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांना भोवणार आहे. या घटनेला वाचा फोडल्यानंतर पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये घटनेला कारणीभूत बाबींचा उलगडा झाल्याने संबंधितांवर कारवाईचे संकेत देत आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

वाशी येथील पालिका रुग्णालयाच्या शवागारातून हा प्रकार घडला होता. त्याठिकाणी दिघा येथील काजल सूर्यवंशी व उलवे येथील उमर शेख यांचे मृतदेह ठेवण्यात आले होते. दोघांचाही मृत्यू कोरोनासदृश्य आजाराने झाल्याने चाचणीसाठी मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु 15 मे रोजी दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना कळवले होते. त्यानुसार मयत कालजला मृतदेह तिच्या वडिलांनी ताब्यात घेऊन त्याच दिवशी अंत्यविधी केला होता. मात्र चार दिवसांनी उमर शेखचे नातेवाईक त्याचा मृतदेह घेण्यासाठी आले असता मृतदेह आढळून आला नाही. अखेर दोन दिवसांनी मृतदेहाची अदलाबदल होऊन काजलच्या ऐवजी उमरचा मृतदेह देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.

रुग्णालयातील हलगर्जीमुळे मुस्लिम तरुणावर हिंदू पद्धतीने अंतिमसंस्कार झाल्याचा हा प्रकार  लोकमतने उघडकीस आणला होता. त्यानुसार मयत उमरच्या नातेवाईकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली असता, पालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमली होती. त्यांनी घटनेशी संबंधित सर्वांची चौकशी केली असता अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रुग्णालयातील तिघा अधिकाऱ्यांना  कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली असून उत्तर समाधानकारक नसल्यास कारवाईचा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे संबंधितांना निष्काळजीपणा चांगलाच भोवणार आहे.

रुग्णालयाच्या शवागारात पालिका हद्दीबाहेरील मृतदेह न ठेवण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत. त्यानंतरही उलवेचा राहणार उमर शेख याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. तर शवागारात जागा अपुरी असल्याने काजल व उमर यांचे मृतदेह एकाच रॅक मध्ये ठेवले. त्यावेळी काजलच्या मृतदेहाची ओळख पटेल अशी माहिती असणारा लेबल देखील आढळला नाही. त्यामुळेच मृतदेहाची अदलाबदल होऊन गंभीर घटना घडल्याचा ठपका पालिका आयुक्तांनी लावला आहे. यामुळे शवागार प्रशासन व दोन डॉक्टरांना त्यांनी शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या घटनेप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तशी मागणी मयत उमरच्या नातेवाईकांनी लावून धरली होती. त्यामुळे संबंधितांनी पालिका आयुक्तांना दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास त्यांना प्रशासकीय कारवाईसह पोलिसांच्या देखील कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

व्हिडीओ ठरला महत्वाचा
मृतदेह गहाळ झाल्यानंतर शोधाशोध सुरु असतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. काजल व उमर यांचे मृतदेह शवागारात एकाच पेटिट ठेवत असताना संबंधिताने माहितीस्तव हा व्हिडीओ काढला होता. तो व्हिडीओ समोर आल्यानंतर शवागारात निष्काळजीपणाचा अनेक बाबी समोर आल्या. तसेच शवागारात 18 पेट्या असताना त्याठिकाणी 32 मृतदेह ठेवले असल्याचीही बाब समोर आली.

Web Title: municipal commissioner issues notice to officers responsible for dead body exchange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.