मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:33 IST2025-12-19T09:32:42+5:302025-12-19T09:33:02+5:30
अदानी ग्रुपच्या मॅनेजरसह चौघांचे लॅपटॉप व मोबाइल चोरीला गेल्याची घटना बुधवारी रात्री ऐरोलीत घडली.

मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
नवी मुंबई : अदानी ग्रुपच्या मॅनेजरसह चौघांचे लॅपटॉप व मोबाइल चोरीला गेल्याची घटना बुधवारी रात्री ऐरोलीत घडली. हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या दोन कारच्या काचा फोडून त्यामधील हे साहित्य चोरीला गेले आहे. त्यापैकी अदानी ग्रुपमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरच्या लॅपटॉपमध्ये विमानतळाशी संबंधित गोपनीय माहिती असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.
ऐरोली सेक्टर १० येथे बुधवारी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबई विमानतळ हाताळणाऱ्या अदानी 'ग' ग्रुपमध्ये वरिष्ठ मॅनेजर पदावर काम करणारे रमेशकुमार सुंदरम हे घराच्या शोधात ऐरोलीला आले होते. यावेळी मित्राच्या प्रतीक्षेत ते काही वेळासाठी तिथल्या हॉटेलमध्ये जेवण करत बसले होते. यादरम्यान हॉटेल बाहेरच रस्त्यालगत त्यांनी त्यांची कार उभी केली होती. सुमारे एक तासाने ते मित्राकडे जाण्यासाठी कारजवळ आले असता त्यांना कारची मागची काच फुटल्याचे दिसून आले. कारचे झालेले नुकसान पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी त्वरित कारमधील मुद्देमालांची तपासणी केली.
दोन्ही कारच्या काचा फोडल्या
सुंदरम यांना कारमध्ये लॅपटॉप बॅग दिसून आली नाही. यावरून त्यांचा लॅपटॉप व त्यामध्ये असलेला पासपोर्ट चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याशिवाय दुसऱ्याही कारची काच फोडून गुरुप्रसाद डांगरे, सचिन देवघरे व अमित साळवी यांचेही लॅपटॉप व मोबाइल चोरीला गेल्याचे समोर आले.
चोरांचे लोकेशन दिसत होते, पण...
१. सुंदरम हे मुंबई विमानतळावर मॅनेजर पदावर असून विमानतळावरील कामकाजाशी संबंधित गोपनीय माहिती लॅपटॉपमध्ये आहे. यामुळे चोरीला गेलेला लॅपटॉप चुकीच्या हाती लागल्यास त्या माहितीचा दुरुपयोग होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.
२. त्यामुळे सुंदरम यांच्यासह डांगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रबाळे पोलिसांकडे धाव घेतली. यावेळी डांगरेंच्या गाडीतून चोरीला गेलेल्या लॅपटॉप बॅगमधील मोबाइलद्वारे चोरट्याचे लोकेशन त्यांना कळत होते.
३. लोकेशन समजत असल्याचे सुंदरम यांनी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना सांगूनही त्यांनी दोन तासांनी प्रतिसाद दिला. तोपर्यंत चोरट्यांनी तो मोबाइल बंद केल्याने त्यांच्या पुढील ठिकाणाची माहिती कळू शकली नसल्याचीही खंत डांगरे यांनी व्यक्त केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.