- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईशिवसेनेच्या प्रयत्नाने वाशी टोलनाक्यावर रुग्णवाहिकेसाठी ग्रीन कॉरिडोर बनवण्यात आला आहे. वाहतूक कोंडीदरम्यान रुग्णवाहिकेला प्राधान्य मिळावे यासाठी ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे. परंतु मानवरहित या यंत्रणेत आधुनिकता आणण्याची गरज सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वाशी टोलनाक्यावर रुग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे. रुग्णांना घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिकांची टोलनाक्यावर वाहतूक कोंडीत अडवणूक होवू नये याकरिता शिवसेनेने एम.एस.आर.डी.सी. कडे हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळताच ३० आॅगस्ट रोजी त्याची सुरवात करण्यात आली. ही संकल्पना राज्यात इतरही टोलनाक्यावर देखील राबवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. परंतु वाशी टोलनाक्यावरील ग्रीन कॉरिडोरच्या संकल्पनेबाबत सर्वसामान्यांना अनेक प्रश्न सतावत आहेत. ही यंत्रणा राबवण्यासाठी खाजगी ठेकेदारामार्फत कामगार नेमलेले आहेत. टोलनाक्यालगत उभारलेल्या टॉवरवर उभा कर्मचारी येणाऱ्या रुग्णवाहिकेवर नजर ठेवून असतो. यादरम्यान टोलकडे येणारी रुग्णवाहिका दिसताच तो झेंडा दाखवून टॉवरखाली उभ्या असलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला इशारा करतो. त्यावेळी राखीव लेन खुली करून रुग्णवाहिकेला पुढे पाठवले जाते. वाशी टोलनाक्यावरून प्रत्येक तासाला ५ ते ६ रुग्णवाहिका मुंबईकडे जातात.टॉवरवरचा कर्मचारी आठ तासांच्या ड्युटीमध्ये केवळ रुग्णवाहिकेवर नजर ठेवून असतो. अशावेळी ऊन, वारा, पावसासह प्रदूषणाचा सामना करत कर्तव्य बजावणाऱ्या या कामगाराकडून त्रुटी होण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे सदर यंत्रणेत तंत्रज्ञानाचा वापर होण्याची गरज व्यक्त होत आहे. टोलनाक्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर सिग्नल आहेत. त्याठिकाणी अद्ययावत स्वयंचलित सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास येणाऱ्या रुग्णवाहिकेची माहिती टोलनाक्यावर कंट्रोलरूमला मिळू शकते. त्यानुसार तिथला कर्मचारी आवश्यकतेनुसार रुग्णवाहिकेसाठी लेन खुली करू शकतो. यामुळे कर्मचाऱ्याचा टॉवरवर उभे राहण्याचाही त्रास टळू शकतो.टोलनाक्यापेक्षा शहरातील काही रस्ते व सिग्नलवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्याठिकाणी अडकलेल्या रुग्णवाहिकेलाही पुढे जाण्यासाठी सहज मार्ग मिळत नाही. याकडे मात्र कोणाचेही लक्ष गेलेले नाही. अशा ठिकाणी वाहतूक कोंडीमधून रुग्णवाहिकेचा मार्ग कसा मोकळा करता येईल यावर उपाययोजनेची गरज आहे. ठाणे - बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर, वाशी सेक्टर ९, कोपरखैरणे डिमार्ट ते सेक्टर १५ नाका, नेरुळ सेक्टर १०, शिरवणे गाव यासह अशी अनेक ठिकाणे आहेत. त्याठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्याचे हमखास पहायला मिळते.रुग्णवाहिकेसाठी कायमस्वरूपी ग्रीन कॉरिडोर ही संकल्पना चांगली आहे. परंतु टोलनाक्यापेक्षा शहरातील काही मार्गावर वाहतूक कोंडी अधिक असते. त्यामधून रुग्णवाहिका कशी सोडवता येईल यावरही अंमलबजावणी आवश्यक आहे.- राकेश सावंत, नागरिक
ग्रीन कॉरिडोरमध्ये आधुनिकतेची गरज
By admin | Updated: September 12, 2015 01:05 IST