नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 08:37 IST2025-11-08T08:33:02+5:302025-11-08T08:37:02+5:30
लवकरच स्क्रिप्ट तयार करणार

नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबईतील बोगस मतदारांच्या नावांची छाननी करून मनसेने त्यांचे प्रदर्शन भरवले आहे. एकाच घरात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मांच्या लोकांची नोंद, निवासाच्या कोणत्याही ठोस ठिकाणाचा उल्लेख नसलेल्या मतदारांपुढे महापालिका आयुक्त निवासस्थानाचा उल्लेख, पामबीच मार्गासोबतच सार्वजनिक शौचालय, शाळेचे नाव असा उल्लेख आहे. अशी नावे, एकाच मोबाइल क्रमांकावरून केलेली २८८ मतदारांची नोंद, तलावाशेजारी मतदारांची नोंद असलेल्या यादीतील नावांचे पोस्टर या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दुबार मतदारांचा पुन्हा नव्याने शोध घेऊन दैवज्ञ हॉलमध्ये पोस्टरच्या माध्यमातून असे प्रदर्शन मांडले आहे. पक्षाचे युवानेते अमित ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.
लवकरच स्क्रिप्ट तयार करणार
पहिल्यांदा अशा प्रदर्शनाचे उद्घाटन करताना दुःख वाटत असल्याची खंत अमित ठाकरे यांनी व्यक्त केली. बोगस, दुबार मतदारांची यादी देऊनही त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. परिणामी आगामी निवडणुकीत मनसे दुबार व बोगस मतदारांचा मतदान केंद्राबाहेरच बंदोबस्त करेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. लवकरच त्याची स्क्रिप्ट तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही संकेत त्यांनी दिले.