दुरावस्था झालेल्या रस्ता दुरुस्तीची कामे दिवाळी सणापुर्वी हाती घ्या, मनसेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 19:18 IST2022-09-28T19:16:38+5:302022-09-28T19:18:41+5:30
दुरावस्था झालेल्या रस्ता दुरुस्तीची कामे दिवाळी सणापुर्वी हाती घ्या अशी मागणी मनसेने केली आहे.

दुरावस्था झालेल्या रस्ता दुरुस्तीची कामे दिवाळी सणापुर्वी हाती घ्या, मनसेची मागणी
मधुकर ठाकूर
उरण : पनवेल रस्त्यावरील फुंडे बस स्थानकाजवळील धोकादायक झालेला साकव बांधण्याचे आणि उरण-करंजा कोस्टल रोडच्या दुरुस्तीचे काम सिडको व सार्वजनिक बांधकाम विभागाने दिवाळी सणापुर्वी तातडीने हाती घेण्याची मागणी उरण मनसेने निवेदनाद्वारे केली आहे. उरण पनवेल रस्त्यावरील धोकादायक साकवाचे काम मागील दोन वर्षांपासून रेंगाळत पडलेले आहे. तर उरण-करंजा कोस्टल रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
त्याचे तातडीने नव्याने डांबरीकरण करणे आवश्यक आहे. धोकादायक झालेल्या साकवामुळे या मार्गावरील अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी बसेस, अवजड वाहनांना दुसऱ्या मार्गाने जावे लागत आहे. ही बाब खार्चिक व वेळेचा अपव्यय करणारी ठरते आहे. यामुळे प्रवासी, नागरिक, व्यापारी यांच्यात नाराजीचा सूर आहे. या दोन्ही कामांच्या पुर्ततेच्या मागणीसाठी बुधवारी (२८) उरणच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार, सिडकोच्या द्रोणागिरी नोड येथील वरिष्ठ अभियंता एम.एम. मुंडे यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.
यावेळी उरण-पनवेल रस्त्यावरील धोकादायक साकव, करंजा कोस्टल रोड दुरुस्ती आणि तालुक्यातील सर्वच खड्डेयुक्त रस्ते खड्डेमुक्त दिपावली सणापुर्वी करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी निवेदनही देण्यात आले आहे. सदर कामे हाती घेण्यात येतील असे आश्वासन सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.