एमएमआरडीएच्या चुकीचा फटका बसला ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 07:26 IST2025-05-10T07:26:43+5:302025-05-10T07:26:53+5:30
पुलाचा गर्डर तिरका झाल्याने लोकल वाहतूक बंद; हजारो प्रवासी ताटकळले

एमएमआरडीएच्या चुकीचा फटका बसला ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांना
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई/ ठाणे : नवी मुंबई व कल्याण-डाेंबिवलीला जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या ऐरोली-काटई मार्गावरील पुलाचे गर्डर अलाइनमेंट तिरके झाल्याचा फटका शुक्रवारी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांना बसला. सकाळपासून दुपारी पाऊणपर्यंत लोकल वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच ठाणे-पनवेल-वाशी लोकल वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे हजारो प्रवासी विविध स्थानकांत अडकून पडले होते.
ऐरोली येथे ठाणे-बेलापूर मार्गासह ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर हे गर्डर बसविण्यात आले. त्यासाठी गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला होता. मात्र, काम संपल्यानंतर गर्डर तिरका झाल्याचे लक्षात आले. यामुळे गंभीर अपघात होण्याची भीती होती. यामुळे खबरदारी म्हणून ठाणे-पनवेल-वाशी मार्गावरील लोकल वाहतूक बंद ठेवली. अचानक कोणतीही सूचना न देता रेल्वेने हा निर्णय घेतल्याने सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना काही कळत नव्हते. त्यातच उद्घोषणाही उशिरा केल्याने प्रवाशांच्या संतापात अधिकच भर पडली. ठाणे-वाशी-पनवेल लोकलने प्रवास करणाऱ्या नवी मुुंबईतील घणसोली, काेपरखैरणे परिसरात राहणाऱ्या प्रवाशांचेही हाल झाले.
ऐरोली येथे झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका मध्य रेल्वेच्या
मुख्य मार्गावरील कर्जत, बदलापूर दिशेच्या प्रवाशांना बसला. त्या मार्गावर लोकल गाड्या सकाळच्या सत्रात अर्धा तास विलंबाने धावल्या. त्यामुळे हजारो प्रवासी ठिकठिकाणी ताटकळले. कल्याण, डोंबिवली स्थानकातही लोकल गाड्यांना विलंब झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला. नोकरदारांना लेट मार्कला सामोरे जाण्याची चिंता होती.
ठाणे-सानपाडा एक सीट ३०० रुपये
ठाणे- पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाल्याने त्याचा मनस्ताप येथील प्रवाशांना सहन करावा लागला. याठिकाणी असलेल्या रिक्षाचालकांनी तर प्रवाशांची लूट केली. ठाणे ते सानपाडा प्रत्येक प्रवाशाकडून ३०० ते ४०० रुपये सीट आकारले जात होते. त्यावरून प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.दुसरीकडे रस्ते मार्गाने जाण्यासाठी ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक १० च्या बाहेर प्रवाशांचा लोंढा आल्याने गर्दीच गर्दी झाली होती. सानपाड्याच्या पुढे जाण्यासाठी ४०० ते ५०० रुपयांची मागणी केली जात होती.