मेट्रोची डेडलाइन आता पाळणारच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 00:16 IST2020-06-21T00:16:24+5:302020-06-21T00:16:44+5:30
कोणत्याही परिस्थितीत यावेळी मेट्रोची डेडलाइन हुकणार नाही, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे

मेट्रोची डेडलाइन आता पाळणारच!
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई मेट्रो हा तितकाच महत्त्वाचा प्रकल्प आहे, परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाची रखडपट्टी सुरू आहे. सध्या मजुरांअभावी मागील तीन महिन्यांपासून हे काम ठप्प आहे. त्यामुळे डिसेंबर, २०२०चा मुहूर्त पुन्हा हुकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असले, तरी कोणत्याही परिस्थितीत यावेळी मेट्रोची डेडलाइन हुकणार नाही, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे, तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
आर्थिक दिवाळखोरीचे कारण देत, मध्यंतरी एका ठेकेदारांने प्रकल्पातून अंग काढून घेतले होते. त्यामुळे दोन वर्षे या कामाची रखडपट्टी झाली, परंतु व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी रखडलेल्या मेट्रोसह विविध प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार, सर्वप्रथम त्यांनी मेट्रोच्या कामासाठी नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली. त्यानुसार, मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी मे, २0१९चा मुहूर्त निश्चित केला. विशेष म्हणजे, मेट्रोची बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. स्थानिक आणि काही ठिकाणी रॅलिंगची किरकोळ कामे शिल्लक आहेत. ही कामेसुद्धा दृष्टिपथात आल्याने गेल्या वर्षी ट्रायल घेण्यात आली, परंतु त्यानंतर कंत्राटदारांनी पुन्हा कच खाली आणि मेट्राच्या कामाची गती मंदावली.
लोकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून कामे पूर्णत: ठप्प आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने विकास कामांना परवानगी मिळाली. त्यानुसार, कामेही सुरू झाली, परंतु मजुरांनी स्थलांतर केल्याने सुरू झालेली कामे पुन्हा बंद पडली. मजुरांची जुळवाजुळव करून कामे पुन्हा सुरू करण्याचे निर्देश सिडकोने संबंधित कंत्राटारांना दिले होते. त्यानंतरसुद्धा काही ठिकाणची कामे बंदच असल्याने सिडकोने याची गंभीर दखल घेतली आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची जवळपास ९0 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित दहा टक्के कामे ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे रखडली आहेत. मेट्रोची डेडलाइन हुकणार नाही. कामात हलगर्जीपणा करणाºया कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा चंद्र यांनी दिला.
>कामाची गती मंदावलेली
सिडकोने २0११मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम मागील आठ वर्षांपासून सुरू आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कामाची गती मंदावली आहे. विशेषत: ठेकेदारांच्या असहकार्याचा फटका या प्रकल्पाला बसला आहे.
>चिनी बनावटीच्या मेट्रो धावणार
चिनी कंपनीबरोबर सिडकोने करार केला असून, ३२0 कोटी रुपये किमतीच्या आठ मेट्रोंची आयात केली जाणार आहेत. त्यापैकी प्रत्येकी तीन डब्यांचे दोन मेट्रो कोच सिडकोच्या ताफ्यात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. त्यानुसार, गेल्या वर्षी या मेट्रो कोचची ट्रायलसुद्धा घेण्यात आली. त्यामुळे डिसेंबर, २०२० मध्ये प्रत्यक्ष मेट्रो सुरू करण्याचा सिडकोचा मानस आहे.दरम्यान, आठपैकी दोन मेट्रो दाखल झाल्या आहेत. उर्वरित सहा मेट्रोसुद्धा लवकरच येतील. एकूणच मेट्रो खरेदी करण्याचा चीनबरोबरच व्यवहार पूर्ण झाला, तो रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सिडकोच्या संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाºयाने स्पष्ट केले आहे.