खारघरमधून साडेपाच लाखाचे एमडी जप्त, नायजेरियन व्यक्तीवर गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 31, 2024 17:01 IST2024-01-31T16:58:28+5:302024-01-31T17:01:52+5:30
खारघर परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

खारघरमधून साडेपाच लाखाचे एमडी जप्त, नायजेरियन व्यक्तीवर गुन्हा दाखल
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी खारघर येथून ५२ ग्रॅम एमडी जप्त केली आहे. याप्रकरणी एका नायझेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने बुधवारी त्याठिकाणी सापळा रचला होता. यामध्ये एका संशयित नायझेरियन व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली. त्यामध्ये त्याच्याकडे ५२ ग्रॅम एमडी हा ड्रग्स आढळून आला.
बाजारभावानुसार त्याची किंमत ५ लाख २० हजार रुपये आहे. अधिक चौकशीत त्याचे नाव गिडिओन इझे (२५) असून तो तळोजाचा राहणारा असल्याचे समोर आले. तो एमडी ड्रग्स घेऊन खारघर परिसरात विक्रीसाठी आला होता. तत्पूर्वीच अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्यावर कारवाई केली. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अमली पदार्थ विरोधी पथक अधिक तपास करत आहे.