ई-चलनविरोधात कळंबोलीत चक्का जाम; पुणे- मुंबई महामार्गावर वाहतुकीचा कोलमडला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:25 IST2026-03-05T11:24:38+5:302026-03-05T11:25:53+5:30
ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल्स, खासगी वाहन व स्कूल बस चालकांचा संताप; आझाद मैदानावरील राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा

ई-चलनविरोधात कळंबोलीत चक्का जाम; पुणे- मुंबई महामार्गावर वाहतुकीचा कोलमडला वेग
अरुणकुमार मेहत्रे
ई-चलन प्रणालीतील कथित मनमानी कारवाईविरोधात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा संताप गुरुवारी कळंबोली येथे उफाळून आला. ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल्स, खासगी वाहन आणि स्कूल बस चालक-मालकांनी पुणे–मुंबई महामार्गावर वाहने उभी करून चक्का जाम आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे सुमारे दिड तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि कळंबोली सर्कलसह परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.
ई-चलन प्रणालीमुळे वाहनचालकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत विविध ट्रान्सपोर्ट संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. गुरुवारी सकाळपासूनच कळंबोली सर्कल परिसरात ट्रक, ट्रॅव्हल्स बसेस, खासगी वाहने तसेच स्कूल बस चालकांनी आपली वाहने महामार्गावर उभी करून निषेध व्यक्त केला. परिणामी पुण्यावरून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. कळंबोली सर्कल परिसरात दोन्ही बाजूंनी वाहतूक मंदावल्याने काही काळ संपूर्ण परिसर जाम झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. आंदोलनकर्त्यांच्या मते, ई-चलन प्रणालीमुळे वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात आहे. अनेक वेळा किरकोळ कारणांवरही मोठ्या रकमेचे चलन पाठवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही वेळा वाहनचालकांच्या मोबाईलवर किंवा पत्त्यावर चलनाची माहिती वेळेवर पोहोचत नसल्याने अडचणी वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आझाद मैदानावरील राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा
राज्यातील विविध ट्रान्सपोर्ट संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांतील ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल्स आणि खासगी बस चालक-मालकांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. ई-चलन प्रणालीतील त्रुटी दूर करून वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारवाईवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मागण्यांवर लवकर तोडगा न निघाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ट्रान्सपोर्ट संघटनांनी दिला आहे.