नवी मुंबईतून विमानोड्डाणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर, एरोड्रोम परवाना मिळाल्याने विमानतळ संचालनाचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:22 IST2025-10-01T09:22:27+5:302025-10-01T09:22:44+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता विनाअडथळा उड्डाणे होऊ शकणार आहेत. या विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून 'एरोड्रोम लायसन्स' जारी करण्यात आले आहे.

नवी मुंबईतून विमानोड्डाणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर, एरोड्रोम परवाना मिळाल्याने विमानतळ संचालनाचा मार्ग मोकळा
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता विनाअडथळा उड्डाणे होऊ शकणार आहेत. या विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून 'एरोड्रोम लायसन्स' जारी करण्यात आले आहे. विमानतळाचे नियमित उड्डाण सुरू करण्यासाठी हा परवाना अत्यावश्यक आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
विमानतळावरून नियमित प्रवासी उड्डाणे सुरू करण्यासाठी सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याचे प्रमाणपत्र म्हणून हा परवाना दिला जातो. यामध्ये रनवे, टर्मिनल, आपत्कालीन यंत्रणा, अग्निशमन सेवा आदींचा समावेश असतो. अनेक महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता हा परवाना प्राप्त झाल्याने विमानतळाच्या मार्गातील अत्यंत महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.
पुढील आठवड्यात विमानतळाचे उद्घाटन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी वाहतुकीस सज्ज झाले आहे. पुढील आठवडाभरात या विमानतळाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. किंबहुना संबधित विभागाकडून त्यादृष्टीने हलचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे एरोड्रोम परवाना प्राप्त झाला असला तरी प्रत्यक्ष प्रवासी आणि मालवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या अखेरीस नवी मुंबई विमातळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.