पनवेलमध्ये महिलाराज

By Admin | Updated: July 7, 2017 06:46 IST2017-07-07T06:45:53+5:302017-07-07T06:46:24+5:30

प्रथम महापौर व उपमहापौर कोण होणार? याविषयी पनवेलकरांना ४० दिवसांपासून लागलेली उत्सुकता अखेर गुरुवारी संपली

Mahilaraj in Panvel | पनवेलमध्ये महिलाराज

पनवेलमध्ये महिलाराज

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : प्रथम महापौर व उपमहापौर कोण होणार? याविषयी पनवेलकरांना ४० दिवसांपासून लागलेली उत्सुकता अखेर गुरुवारी संपली. दोन्ही पदांवर महिला विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या कविता चौतमल शहराच्या प्रथम नागरिक होणार आहेत. राज्यातील पहिल्या नगरपालिकेच्या शेवटच्या नगराध्यक्षा असलेल्या चारुशीला घरत यांची उपमहापौरपदी वर्णी लागणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने भारतामधील शहरांचे व्यवस्थापन पाहण्यासाठी नगरपालिका कायदा तयार केला. पनवेल ही या कायद्याअंतर्गत राज्यात स्थापन झालेली पहिली नगरपालिका. पूर्ण तालुक्याचे शहरीकरण झाल्यामुळे शासनाने नगरपालिका व सिडको विकसित नोड व ग्रामपंचायती मिळून महापालिकेची स्थापना केली. भविष्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ व नैना, मेट्रो सारखे प्रकल्प परिसरामध्ये असल्याने महापालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर महापौर व उपमहापौरपदावर कोणाची वर्णी लागणार? याविषयी उत्सुकता लागून राहिली होती.
महापालिकेच्या विकासाची पायाभरणी करण्याची जबाबदारी नवीन पदाधिकाऱ्यांवर असल्याने त्यांची निवड करताना भाजपा नेतृत्वासमोर आव्हान होते. महापौरपद अनुसूचित जातींमधील महिला प्रवर्गासाठी राखीव होते. भाजपाकडे चार नगरसेविकांचा पर्याय होता. यामध्ये कविता चौतमल यांची निवड करण्यात आली आहे. नवीन पनवेलमधील नागरिक ठाकूर कुटुंबीयांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहिले आहेत. यामुळेच प्रशांत ठाकूर व स्थानिक नेते संतोष शेट्टी यांचे जवळचे कार्यकर्ते असणाऱ्या किशोर चौतमल यांच्या पत्नीला महापौरपदाची उमेदवारी दिली आहे.
महापालिकेचे उपमहापौर खुल्या प्रवर्गासाठी असतानाही भाजपाने महिलेलाच त्या पदावर संधी दिली आहे. नगरपालिकेच्या शेवटच्या नगराध्यक्षा असलेल्या चारुशीला घरत यांची निवड करण्यात आली आहे. घरत यांनी पाच वर्षे नगरपालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे चालविला होता. त्यांनी आतापर्यंत शहराच्या विकासासाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना सभागृहाचे कामकाज चालविण्याचा व प्रशासनाचा अनुभव असल्याने त्याचा लाभ करून घेण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

नावउमेदवारीपक्षशिक्षणसंपत्ती
डॉ. कविता किशोर चौतमलमहापौरभाजपावैद्यकीय पदवी१५ लाख ३३ हजार
हेमलता रवि गोवारीमहापौरशेकाप१२वी १ कोटी ४१ लाख
चारूशीला कमलाकर घरतउपमहापौर भाजपाडी.एड.६६ लाख
रवींद्र अनंत भगतउपमहापौर शेकापनववी२ कोटी ३४ लाख

Web Title: Mahilaraj in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.