वीजचोरांविरोधात महावितरणच्या माध्यमातून विशेष मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 00:21 IST2019-12-14T00:20:00+5:302019-12-14T00:21:02+5:30
महावितरणच्या पनवेल ग्रामीण विभागातील विशेष पथकाने नोव्हेंबर व डिसेंबर २०१९ मध्ये ही कारवाई केली आहे.

वीजचोरांविरोधात महावितरणच्या माध्यमातून विशेष मोहीम
पनवेल : महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत पनवेल ग्रामीण भागात महावितरणच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवून दोन महिन्यांत सुमारे १४ लाख ५१ हजार २५० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत ६३ जणांवर वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरणच्या पनवेल ग्रामीण विभागातील विशेष पथकाने नोव्हेंबर व डिसेंबर २०१९ मध्ये ही कारवाई केली आहे. भांडुप परिमंडलच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण व पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल ग्रामीण विभागातील सर्व उपविभागांतर्गत वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली आहे. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
पनवेल दोन विभागात आपटा, साई, चावणे, रिस व कोळखे या विभागात सर्वात जास्त ३१ वीजचोरीची प्रकरणे उघड झाली आहेत. पनवेल ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजाराम माने यांनी बेकायदेशीर वीज वापर करणाऱ्या लोकांना प्रामाणिकपणे वीज वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच भविष्यात वीजचोरीवर आळा घालण्यासाठी अशाच प्रकाराची धडक कारवाई करीत विशेष मोहीम राबविली जाणार असल्याचे स्पष्ट केले.