Maharashtra Election 2019: Voters are stop by the deterioration of the voting system | मतदानयंत्रांत बिघाडामुळे मतदार खोळंबले

मतदानयंत्रांत बिघाडामुळे मतदार खोळंबले

डोंबिवली : डोंबिवली मतदारसंघासाठी ३२३ मतदानकेंद्रांवर सोमवारी कुठेही गालबोट न लागता शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांचा ओघ कमी होता. त्यात दुपारी काही प्रमाणात वाढ झाली तरी मतदारांचा निरुत्साह स्पष्ट दिसत होता. दिवसभरात केवळ अंदाजे ४५ टक्के मतदान झाले. गेल्या वेळच्या तुलनेत मतदानात किंचित वाढ झाली आहे.

कुठेही मतदान प्रक्रियेला गालबोट न लागता मतदान झाले. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था तंतोतंत पाळली गेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार म्हणाले. या मतदारसंघात एकूण तीन लाख ५१ हजार ५२६ मतदार होते. त्यामध्ये एक लाख ८१ हजार ६८१ पुरुष, एक लाख ६९ हजार ८४५ महिला मतदारांचा समावेश होता. ठाकुर्ली येथील महिला समिती शाळेतील मतदान केंद्रांवरील एका ईव्हीएम मशीनच्या बॅटरीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे ही यंत्रे बदलण्यात आली. अन्य दोन ठिकाणीही यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पवार म्हणाले. तसेच, १४ ठिकाणच्या व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. बोगस मतदानाचीही कुठेही तक्रार आली नसल्याचेही पवार म्हणाले.

या मतदारसंघामध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण, मनसेचे मंदार हळबे, काँग्रेसच्या राधिका गुप्ते, बसपाचे दामोदर काकडे, संभाजी ब्रिगेड पार्टीचे डॉ. अमितकुमार गोईलकर आणि अपक्ष भागवत गायकवाड या उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदानयंत्रात बंद झाले. भाजप विरुद्ध मनसे अशी लढत असली तरी काँग्रेसने महिला उमेदवार दिल्याने त्या किती मते घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत संथगतीने मतदान झाले. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ६ यादरम्यान मतदानाला वेग आला. ठिकठिकाणच्या केंद्रांवर मतदारांची पुन्हा गर्दी झाली होती. सकाळी पावसाचे सावट होते, मात्र ९ वाजल्यानंतर आकाश निरभ्र झाल्याने उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दिव्यांगांसाठी आठ रिक्षांची सुविधा करण्यात आली होती. केंद्रांवर ज्येष्ठांना विशेष सुविधा मिळाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले.

प्रचारात शहरातील खड्डे, अस्वच्छता आदी मुद्दे गाजले. सोशल मीडियावरून उमेदवारांनी एकमेकांवर चिखलफेक केली. जातीचे कार्डही वापरण्यात आल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली.

ज्येष्ठ नागरिक जखमी

भालचंद्र नाटेकर (७८) या ज्येष्ठ नागरिक मतदाराला भोवळ आली आणि त्यांचा तोल जाऊन ते टिळकनगर येथील मतदान केंद्रात मतदानाला जात असताना पायऱ्यांवरून खाली पडले. हे पाहताच पोलिसांनी धाव घेत त्यांच्यावर प्रथमोपचार करून मतदान केंद्राजवळ नेले.

Web Title: Maharashtra Election 2019: Voters are stop by the deterioration of the voting system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.