घराचे हप्ते भरण्यासाठी थकबाकीदारांना अखेरची संधी; सिडकोकडून १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

By कमलाकर कांबळे | Published: November 7, 2023 08:00 PM2023-11-07T20:00:48+5:302023-11-07T20:01:02+5:30

नियमानुसार असे वाटपपत्र रद्द करण्याची सिडकोकडे तरतूद आहे; परंतु, अर्जदारांच्या विनंतीवरून थकीत हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ दिली.

Last chance for defaulters to pay house installments; Extension from CIDCO till January 10 | घराचे हप्ते भरण्यासाठी थकबाकीदारांना अखेरची संधी; सिडकोकडून १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

घराचे हप्ते भरण्यासाठी थकबाकीदारांना अखेरची संधी; सिडकोकडून १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई : आपल्या महागृहनिर्माण योजनेतील अनेक पात्र अर्जदारांनी वारंवार मुदवाढ देऊनसुद्धा घराचे हप्ते भरलेले नाहीत. अशा थकबाकीदारांना पैसे भरण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार सदनिकेच्या हप्त्यांचा भरणा न केलेल्या अर्जदारांना संपूर्ण रक्कम भरण्यासाठी १० जानेवारी २०२४ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

सिडकोने २०१८-१९ मध्ये महागृहनिर्माण योजनेअंतर्गत विविध प्रवर्गासाठी घरांची सोडत काढली होती. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे उपलब्ध करून दिली होती. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या पाच नोडमध्ये ही घरे बांधली आहेत. त्यासाठी काढलेल्या संगणकीय सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या आणि कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या अर्जदारांना ९ नोव्हेंबर १९१९ ते २१ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत टप्प्याटप्याने घरांचे वाटपपत्रे दिली होती.

याअंतर्गत अर्जदारांना घराच्या एकूण रकमेच्या समान हप्त्यांचे वेळापत्रकही देण्यात आले होती. त्यापैकी काही अर्जदारांनी एकूण हप्त्यांपैकी काही हप्त्यांचा वेळेत भरणा केला. मात्र, काही अर्जदारांनी आतापर्यंत एकही हप्ता भरलेला नाही. नियमानुसार असे वाटपपत्र रद्द करण्याची सिडकोकडे तरतूद आहे; परंतु, अर्जदारांच्या विनंतीवरून थकीत हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ दिली. त्यानुसार सिडकोने ३० एप्रिल २०२३ पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतरही अनेक अर्जदारांना या संधीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अर्जदारांकडून केली आहे. या पार्श्वभूमीवर घराचे थकीत हप्ते भरण्यासाठी १० जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विशेष म्हणजे, हे हप्ते विलंब शुल्कासह भरावयाचे असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

महागृहनिर्माण योजनेतील अनेक पात्र अर्जदारांना विविध कारणांमुळे घराचे हप्ते भरता आलेले नाहीत. त्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अर्जदारांकडून वेळोवेळी केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन सिडको महामंडळाने अशा अर्जदारांना थकीत हप्ते भरण्यासाठी एक अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.- अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Web Title: Last chance for defaulters to pay house installments; Extension from CIDCO till January 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.