दक्षीणेतील आंब्याचे बाजारपेठेवर वर्चस्व लालबाग बदामीची आवकही वाढली, कोकणच्या हापूसची आवक झाली कमी
By नामदेव मोरे | Updated: April 13, 2023 18:17 IST2023-04-13T18:17:35+5:302023-04-13T18:17:49+5:30
पुढील एक महिना कोकणपेक्षा दक्षीणेकडील आंब्याचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दक्षीणेतील आंब्याचे बाजारपेठेवर वर्चस्व लालबाग बदामीची आवकही वाढली, कोकणच्या हापूसची आवक झाली कमी
नवी मुंबई : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणच्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षीणेकडील राज्यातील आवक वाढली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये बदामी, लालबाग, तोतापुरी, गोळा आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. पुढील एक महिना कोकणपेक्षा दक्षीणेकडील आंब्याचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कोकणातून २६२९३ पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामीळनाडू, केरळ मधून ४५०७० पेट्यांची आवक झाली आहे. कोकणातून ६०४ टन व दक्षीणेकडून ७८५ टन आंब्याची आवक झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरातून एप्रिल महिन्यात आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यातही अपेक्षीत आवक होणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कोकणच्या हापूसला बाजार समितीमध्ये ३०० ते १ हजार रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १६०० रुपये डझन दराने हापूस विकला जात आहे.
बाजार समितीमध्ये बदामी २५ ते ८० रुपये किलो, लालबाग ३० ते ५०, तोतापुरी २० ते ४०, गोळा ३० ते ४० रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १५० रुपये किलो दराने हे आंबे उपलब्ध आहेत. कर्नाटकी हापूसला होलसेल मार्केटमध्ये ८० ते १५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १२५ ते २५० रुपये भाव मिळत आहे. यावर्षी कोकणामध्ये हापूसचे पिक कमी प्रमाणात असल्यामुळे यापुढेही दक्षीणेकडील आंब्याचे बाजारपेठेवरील वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे.
कोकणातून प्रतिदिन २५ ते ३० हजार पेट्यांची आवक सुरू आहे. पुढील एक महिना कोकणातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. दक्षीणेकडील राज्यांमधून ४० ते ४५ हजार पेट्यांची आवक सुरू आहे.
संजय पानसरे, संचालक बाजार समिती